तेल उत्खनन आणि त्याच्याशी संबंधित सर्व मुद्दे निकालात निघाले असून येत्या दोन महिन्यांत देशातून नैसर्गिक वायू व तेल उत्पादन प्रक्रिया वेग पकडेल, असा विश्वास या खात्याचे केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केला.
मोईली हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. सोमवारी उशिरा त्यांनी तेल व वायू उत्पादकांशी चर्चा केली. उत्पादकांच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी या क्षेत्राच्या समस्याही जाणून घेतल्या. वायू किमतीसह उत्पादकांना असलेल्या विविध शंकेबाबत सकारात्मक चर्चा झाली असून नैसर्गिक स्रोत उत्पादन प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत वेग पकडेल, असा विश्वासही आपण त्यांना दिल्याचे ते म्हणाले.
इराणबरोबरच्या कराराचा उल्लेख करत मोईली यांनी तेल आयात खर्च कमी झाल्याने सरकारच्या तिजोरीवरील भार कमी होईल, असा आशावाद या वेळी व्यक्त केला. या देशाबरोबर भारतीय चलनामध्ये व्यवहार करण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. २०३० पर्यंत भारत ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे ध्येय राखत असून याबाबतचा डॉ. विजय केळकर समितीचा अहवालही लवकरच अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. भारत एके दिवशी नैसर्गिक वायू व तेल उत्खननात आघाडीचा देश बनून स्वत:ची इंधन गरज भागविण्यासह प्रसंगी निर्यातही करू शकेल, असेही ते म्हणाले.
भारताच्या तेल व वायू उत्खनन क्षेत्रात खासगी कंपन्यांना खूपच वाव असून गुंतवणूकदारांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आपण सोमवारच्या बैठकीत केल्याचेही मोईली यांनी सांगितले. त्यांच्या अडचणी सुटण्याच्या दृष्टीने येत्या दोन महिन्यांत प्रगती होईल, असेही ते म्हणाले. कंपन्या, गुंतवणूकदार यांच्याशी दीर्घकालीन उपाययोजनांबाबतही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
वायू दरवाढीबाबत आता माघार नाही; बँक हमीबाबत रिलायन्सबरोबरचा तिढाही सुटेल!
नैसर्गिक वायूच्या किमती नव्या आर्थिक वर्षांपासून दुप्पट करण्याच्या सरकारच्या निर्णयावर फेरविचार व माघारीची शक्यता फेटाळून लावताना, या संबंधाने खासगी क्षेत्रातील रिलायन्सबरोबरचा तिढाही सुटेल असा विश्वास मोईली यांनी व्यक्त केला. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. उत्खनन कमी होण्याच्या शंकेने सरकारने कंपनीकडे १३.५ कोटी डॉलरची बँक हमी मागितली आहे. यावरून उभयतांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. मात्र हे सारे प्रकरण नव्या तेल उत्खनन प्रक्रियेपूर्वी मिटेल, असा विश्वास कंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केला. दहाव्या टप्प्यातील उत्खनन प्रक्रिया जानेवारी २०१४ पासून सुरू होण्याची शक्यता असून याअंतर्गत ८६ विहिरी निश्चित केल्या आहेत. बीपी या ब्रिटनच्या भागीदार कंपनीच्या सहकार्याने रिलायन्स केजीडी खोऱ्यातून घेत असलेल्या तेल साठय़ाचा शोध हा सर्वात मोठा ठरणार आहे. मात्र त्यातून अपेक्षित उत्पादनाबाबत खुद्द कंपनीनेच शंका उपस्थित केली आहे. यासाठी सरकारने कंपनीच्या दोन विहिरींसाठी १३.५ कोटी डॉलरच्या बँक हमीची अट घातली आहे.