म्युच्युअल फंडांचे जाळे शहरांकडून खेडय़ांकडे विकेंद्रित करण्याच्या दृष्टीने म्युच्युअल फंडाची खरेदी आता समाजमाध्यमांच्याद्वारे करणे शक्य होणार आहे. ध्वनी व माहितीच्याद्वारे ही खरेदी शक्य होणार आहे.
देशातील काही आघाडीच्या यूटीआय, एल अ‍ॅन्ड टी, क्वांटम,  आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, अ‍ॅक्सिस, रिलायन्स या म्युच्युअल फंडानी आपली यूनिटची खरेदी व विक्री या समाजमाध्यमांद्वारे (सोशल नेटवर्किंग) करणे शक्य केले आहे.  अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने ‘इझी सíव्हस’ या संकल्प अंतर्गत इझी कॉल, इझी एसएमएस व इझी अ‍ॅपद्वारा केवळ एक मिसकॉल किंवा एका एसएमएसद्वारा आपल्या योजनांची खरेदी – विक्री उपलब्ध करून दिली आहे.
एल अ‍ॅड टी म्युच्युअल फंडाने ‘गो इनव्हेस्ट’ या संकल्पनेत आपल्या फेसबुकवर गुंतवणुकीचे लेखजोखा ठेवणे शक्य केले आहे. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत समाजमाध्यमांचा वापर कसा वाढविता येईल यावर शिफारस करण्यासाठी बाजार नियंत्रक सेबीने तज्ञांच्या समितीची स्थापन केली आहे. यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार विकेंद्रीत होण्यास मदत होईल. वाढत्या मोबाईलधारकांच्या संख्येने हे शक्य होईल, असे सेबीला वाटते. खास करून आजचे तरुणाईत स्मार्ट फोन व इंटरनेटचा वापर वाढल्याने याचा उपयोग ग्रामीण भागातील गुंतवणूकदाराना अधिक होईल. सध्या अनेक म्युच्युअल फंडानी आपल्या योजनांच्या यूनिटची खरेदी – विक्री आपल्या संकेतस्थळावर करणे शक्य केले आहे.
‘सध्याच्या डिजिटलायझेशन’मुळे म्युच्युअल फंड खरेदी – विक्री सहज शक्य झाली आहे. वाढत्या इंटरनेट वापरकर्त्यांमुळे व स्मार्टफोन वापरकर्त्यांमुळे डिजिटल खरेदी हाच म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा पहिला विकल्प राहिला आहे, असे क्वांटम म्युच्युअल फंडच्या हर्षद चाटणवाला यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Story img Loader