माझ्या नावावर कोटय़वधीची संपत्ती आहे. मात्र मला अमूक देशाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. — रक्कम माझ्या या खात्यात जमा करा. बाहेर येताच ती देईल.. अथवा महिन्याला केवळ अमूक रक्कम भरा आणि निवृत्तीप्रसंगी — घसघशीत रक्कम पदरात पाडा.. असे विदेशी नावाने येणारे ई-मेल किंवा (आकडय़ांऐवजी) अक्षरांवरून येणारे एसएमएस तसे तुम्हा – आम्हाला नवे नाहीत.
अधिक परताव्याच्या आमिषाने गंडविले जाणाऱ्यांकडून आता थेट आकर्षक गुंतवणुकीसाठी भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर यांनाच पुढे केले गेले आहे. गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे नाव आणि छायाचित्र वापरून ‘मला फक्त १५,५०० रुपये द्या आणि तुम्ही ५.५० कोटी रुपये मिळवा’ अशी शक्कल घोटाळेबाजांनी लढविली आहे. ब्रिटन सरकारच्या नावाने अशी धर्तीचा ई-मेल सध्या भारतात फिरत आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर ब्रिटन सरकार तसेच संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांच्या हवाल्याने अशा आशयाचा ई-मेल सध्या अनेक भारतीयांच्या खात्यात येऊन धडकत आहे.
या ई-मेलमध्ये भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे नाव, हुद्दा तसेच छायाचित्रही समाविष्ट करण्यात आले आहे. सोबतच ‘हार्दिक अभिनंदन’ अशी तळटीपही देण्यात आली आहे.
‘लॉटरी’ असे संबोधून सुरुवातीला काही रक्कम शुल्क म्हणून दिल्यास उर्वरित रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यासही ‘फिशिंग मेल’ विसरलेला नाही. ब्रिटन सरकारकडून रिझव्र्ह बँकेला द्यावयाच्या रकमेसाठी संयुक्त राष्ट्र सचिवांबरोबर सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीतच ‘आपले’ नाव या ‘लॉटरी’साठी निश्चित करण्यात आल्याचेही ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
याबाबत गुप्तता पाळण्याचे आवाहन करून ई-मेलमध्ये ज्याच्या खात्यात रक्कम जमा करावयाची त्या ‘रिझव्र्ह बँके’च्या सर व्यवस्थापकाचा कर्मचाऱ्याचा ओळख क्रमांक व खाते क्रमांकही देण्यात आला आहे.
खऱ्या रिझव्र्ह बँकेने अर्थातच अशा कोणत्याही निधी उभारणीचा प्रयत्न सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मध्यवर्ती बँक गुंतवणूकदारांना सजग राहण्यासाठी वेळोवेळी सूचित करत असते, असेही म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा