ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कन्झ्युमर हेल्थकेअर लि. (जीएसकेसी)चे प्रवर्तक ग्लॅक्सोस्मिथक्लाइन पीटीई लि. आणि हॉर्लिक्स लिमिटेड यांनी भारतातील आपल्या या कंपनीतील भांडवली हिस्सा आणखी ३२ टक्क्यांनी वाढविण्यासाठी किरकोळ भागधारकांसाठी खुला प्रस्ताव दिला असून, त्याची सुरुवात येत्या १७ जानेवारीपासून होत आहे.
या खुल्या प्रस्तावाला अपेक्षित यश मिळाल्यास जीएसकेसीमधील प्रवतर्काचे भागभांडवल ७५ टक्के इतके होईल. १७ जानेवारी ते ३० जानेवारी २०१३ या दरम्यान सुरू राहणाऱ्या या खुल्या प्रस्तावातून कंपनीकडून ३१.८४ टक्के म्हणजे किरकोळ भागधारकांकडे असलेले सुमारे १.३३ कोटी समभाग प्रत्येकी रु. ३,९०० किमतीला खरेदी (शुक्रवार, २१ डिसेंबरचा बंद भाव रु. ३,७६२) केले जाणार आहेत. कंपनीकडून या खुल्या प्रस्तावाची घोषणा झाली, त्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरचा जीएसकेसीचा बंद भाव रु. ३,०४० च्या तुलनेत कंपनीने भागधारकांना तब्बल २८ टक्के अधिमूल्य देऊ केले आहे. त्यामुळे कंपनीचा प्रस्ताव आकर्षक असून, यापुढे किंमतवृद्धी होण्याची फार आशा दिसत नसल्याने भागधारकांनी समभाग विकण्याची ही संधी सोडू नये, असे ‘स्पार्क कॅपिटल’ या विश्लेषक संस्थेने सुचविले आहे. स्पार्कच्या संशोधन अहवालानुसार, प्रस्तावापश्चात म्हणजे ३० जानेवारी २०१३ नंतर जीएसकेसीचा भाव रु. २,८९५ पर्यंत खाली येऊ शकतो. त्यामुळे सध्या चालून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.