सरलेल्या दिवाळीला अगदी तोळ्यामागे ३२ हजार रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचलेले सोने आठवडय़ाभरात ३० हजारांवरून थेट २७ हजाराच्याही खाली आले आहे. गेल्या दशकभरात सर्वाधिक परतावा मिळवून देणाऱ्या सोन्यातील पूंजीला शेअर बाजारातील गुंतवणुकीसारखीच २०१३ सालात अवकळा आली आहे. मौल्यवान धातू दर गडगडण्यास अनेक आंतरराष्ट्रीय निमित्तांचे नख पुढे केले जात असले तरी भारतासारख्या देशात ऐन सण-समारंभाच्या मोसमात सोन्यातील गुंतवणूक चिंतेचा विषय बनली आहे. दोन दिवसांच्या हजारी दरघसरणीने तर १० ग्रॅमसाठी सोने दर तब्बल अडीच हजारांनी खालावले आहे.
सोने दराचा मुंबईच्या सराफ बाजारातील बंद भाव आता प्रति १० ग्रॅमसाठी थेट २७ हजाराच्याही खाली आला आहे. शनिवारी तोळ्यामागे एकदम १,२५० ची घट नोंदविताना सोने दराने २७,८८० भाव राखताना गेल्या वर्षभरातील नीचांक गाठला होता. तर सोमवारीही याच व्यासपीठावर स्टॅण्डर्ड सोने पुन्हा तोळ्यासाठी १,३३० रुपयांनी कमी होत २६,५५० रुपयांवर आला.
पिवळ्याबरोबर पांढऱ्या धातूच्या दराची चकाकीही लुप्त होऊ पाहत आहे. शनिवारी किलोसाठी ५० हजारावर येऊन ठेपलेल्या चांदीचा दर सोमवारी तब्बल ३,६०० रुपयांहून अधिक गडगडला. परिणामी गेल्या वर्षभरात ७५ हजार रुपये मोजून हात पोळून घेणाऱ्या चांदीतील गुंतवणूकदारांची धडकी पुन्हा वाढली आहे. शहरात किलोला चांदीचा दर थेट ५० हजार रुपयांवरून अगदीच ४७ हजार रुपयांच्याही खा गेला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोने प्रती औन्स (३३ ग्रॅम) १,४०० डॉलर या गेल्या दोन वर्षांच्या तळात गेले आहे. हा भाव आणखी खालावणार काय असा जगातील सर्वात मोठी सोन्याच्या ग्राहकांची बाजारपेठ असलेल्या भारताच्या जनमानसाच्या दृष्टीने लाखमोलाचा प्रश्न बनला आहे.
सोने-चांदीतील घसरण ही अंतिम टप्प्यातील पोहचली असल्याचा बहुतांश विश्लेषकांचा कयास आहे. यापुढे आणखी फार तर प्रति तोळा ३००-४०० रुपयांची भावात घट होईल, असा अंदाज आहे. तर सोने दर १० ग्रॅमसाठी २५ हजार रुपयांवर येते काही दिवस स्थिरावेल, असेही सराफांना वाटते. सोने दरात सध्या २२ टक्क्यांर्पयची घसरण नोंदली गेली आहे. २००५ ते २०१० या दरम्यान ७ हजार रुपयांवरून थेट २१ हजार रुपयांवर गेलेले सोने या कालावधीत २०० टक्क्यांनी वाढते राहिले आहे.
* शनिवारी तोळ्यामागे एकदम १,२५० ची घट
* सोमवारी पुन्हा १,३३० रुपयांनी घसरण
प्रति १० ग्रॅम बंद घाऊक भाव २६,५५० रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारात पडझड का?
* डॉलरचे अधिक भक्कम होणे : अमेरिकेतील भांडवली बाजार, किरकोळ वस्तू खरेदी-विक्री बाजारात चिंताजनक वातावरण आहे. याचा परिणाम ग्राहकांच्या क्रयशक्तीवरही होत आहे. डॉलरचे मूल्य वाढणे हे सोने दरातील घसरणीसाठी प्रबळ कारण ठरते.
* अमेरिकी अर्थव्यवस्था सावधरित्या सावरत असताना कदाचित फेडरल रिझव्र्ह बँकेकडून आर्थिक सहकार्याचा हात मुदतीपूर्वीच काढून घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच आता सोन्यासारख्या गुंतवणूक पर्यायात अधिक विश्वास येईल, अशी चिन्हे वर्तविली जात आहेत.
* आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातू दर गेल्या दोन वर्षांच्या नीचांकावर येऊन ठेपले आहेत. ते अधिक खोलात जाण्याची चिंता गुंतवणूकदारांना आहेच. यामुळे मागणी कमी होऊन सोन्यातील गुंतवणुकीवर कितपत विश्वास ठेवायचा, याचीही धास्ती गुंतवणूकदारांमध्ये वाढत आहे.
* युरोपीय संघातील अर्थविवंचनेत असलेल्या सायप्रसमार्फत सोन्याची खुल्या बाजारातील विक्री संभवली जात आहे. ४० कोटी युरो अर्थात ५२ कोटी डॉलर यामार्फत उभारले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर या प्रक्रियेत इटली आणि पोर्तुगालही सहभागी होण्याची अटकळ आहे.
सोने घसरणीचा पूर!
सरलेल्या दिवाळीला अगदी तोळ्यामागे ३२ हजार रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचलेले सोने आठवडय़ाभरात ३० हजारांवरून थेट २७ हजाराच्याही खाली आले आहे. गेल्या दशकभरात सर्वाधिक परतावा मिळवून देणाऱ्या सोन्यातील पूंजीला शेअर बाजारातील गुंतवणुकीसारखीच २०१३ सालात अवकळा आली आहे.
First published on: 16-04-2013 at 02:41 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold futures prices hit lower circuit drops 6 on global cues