केंद्राने अलीकडेच लागू केलेल्या नवीन सोन्याच्या हॉलमार्किंग नियमांच्या विरोधात देशभरातील ज्वेलर्सनी संप पुकारला आहे. ऑल इंडिया जेम ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी) ने दावा केला आहे की संपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतेक दागिन्यांची दुकाने बंद राहतील.तसेच ३५० ज्वेलरी संघटना संपाचा भाग असल्याचेही म्हटले आहे. ज्वेलरी बॉडी सरकारच्या हॉलमार्किंग युनिक आयडी (HUID) सिस्टीमच्या विरोधात आहेत ज्याचा त्यांनी सोन्याच्या शुद्धतेशी काहीही संबंध नसून फक्त एक ट्रॅकिंग यंत्रणा आहे असं त्याचं म्हणणं आहे. सरकारच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करूनही संघटनांनी संप केला आहे. अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्याच्या ५० दिवसांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे अनिवार्य हॉलमार्किंग हे “भव्य यश” आहे असे केंद्राने ठासून सांगितले. नवीन हॉलमार्किंग नियमांबद्दल आपल्यालाही माहित असणे आवश्यक आहे.
गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे काय?
गोल्ड हॉलमार्किंग हे धातूचे शुद्धता प्रमाणपत्र आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) त्याची व्याख्या “मौल्यवान धातूच्या लेखांमध्ये (precious metal articles) मौल्यवान धातूच्या प्रमाणित सामग्रीचे अचूक निर्धारण आणि अधिकृत रेकॉर्डिंग” म्हणून करते.गोल्ड हॉलमार्किंग पूर्वी स्वैच्छिक स्वरूपाचे (voluntary in nature)होते, परंतु सोन्याच्या ग्राहकांची विक्रेत्यांकडून फसवणूक होऊ नये या हेतूने सरकारने हे बंधनकारक केले. करोना विषाणू साथीच्या आजारामुळे ज्वेलर्सनी वेळ मागितल्याने मुदत दोनदा वाढवण्यात आली होती.
नवीन नियम कधी लागू झाले?
सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग, मौल्यवान धातूचे शुद्धता प्रमाणपत्र, १६ जूनपासून टप्प्याटप्प्याने अंमलात आले. पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील २५६ जिल्हे असा समावेश केला.
ज्वेलर्सनी नियमांचे पालन केले नाही तर काय होईल?
नवीन नियमांनुसार, BIS हॉलमार्कशिवाय दागिने किंवा १४,१८ किंवा २२ कॅरेट सोन्याचे बनवलेले आर्टिफॅक्ट विकले गेल्यास, ज्वेलरला वस्तूच्या किंमतीच्या पाचपट दंड किंवा एक वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो.
केंद्राने जूनमध्ये जाहीर केले होते की जे ज्वेलर्स सोन्याचे दागिने आणि कलाकृतींच्या अनिवार्य हॉलमार्किंगचे पालन करत नाहीत त्यांना ऑगस्टपर्यंत कोणताही दंड आकारला जाणार नाही. सरकारच्या मते, दागिन्यांवरील हॉलमार्किंग अस्सल आहे याची खात्री करण्यासाठी, कॅरेट आणि सूक्ष्मता, बीआयएस चिन्ह, ओळख चिन्ह किंवा हॉलमार्किंग सेंटरची संख्या आणि ज्वेलर्सची संख्या हे असणे आवश्यक आहे.