लग्नसराईच्या निमित्ताने पुन्हा बहरलेली सोने खरेदी, सोमवारी मौल्यवान धातूला तोळ्यसाठी सोमवारी ३२ हजार रुपयांनजीक घेऊन गेली. उत्कृष्ट गुंतवणूक पर्याय असलेले सोने गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असून डिसेंबर २०१२ पर्यंत ते १० ग्रॅममागे ३५ हजार रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
दिवाळी संपताच लग्न सराईला झालेल्या सुरुवातीने मौल्यवान पिवळ्या धातूचे दर नव्या विक्रमी उच्चांकाला पोहोचले आहे. तोळ्यासाठी सोने सोमवारी ३३ हजार रुपयांपर्यंत जाऊन विसावले आहे. तर चांदीनेही किलोसाठी ६४ हजार रुपयांचा आकडा गाठला आहे. नव्या वर्षांतही विवाहाचे मुहूर्त असल्याने डिसेंबर २०१२ अखेपर्यंत सोन्याचे दर ३५ हजार रुपयांचाही पल्ला ओलांडतील असा सराफांचा होरा आहे.
मुंबईच्या सराफा बाजारात तोळ्यासाठी सोन्याचा दर ३२,५०० रुपयांपर्यंत गेला आहे. तर शुद्ध प्रकारातील सोनेही याच वजनासाठी ३२,६४० रुपये होता. एकाच सत्रात त्यामध्ये शनिवारच्या तुलनेत १५५ ते १६० रुपयांची वाढ झालेली पहायला मिळाली. शहरात चांदीही आज एकाच दिवसात तब्बल ३९० रुपयांनी वधारून किलोला ६४,३५० रुपयांपर्यंत पोहोचली. व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या धातूची अधिक खरेदी झाल्याने चांदी गेल्या अनेक सत्रानंतर प्रथमच ६४ हजारांपुढे गेली आहे.
नवी दिल्लीच्या बाजारपेठेत १० ग्रॅम सोन्याला ३२,९५० रुपये भाव मिळाला. येथे यापूर्वी सर्वाधिक दर १४ सप्टेंबर रोजी होते. तर राजधानीत चांदीचा किलोचा भावही ६३,२०० रुपयांपर्यंत गेला आहे. गेल्या तीन दिवसातच सोने दरात १० ग्रॅममागे जवळपास ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, लंडनमध्ये दीड महिन्यानंतर प्रथमच सोने दर उंचावले आहेत. ११ ऑक्टोबरनंतर येथे प्रती औन्सला (२८.३५ ग्रॅम) सोने १,७४८.७६ डॉलपर्यंत गेले आहे.

Story img Loader