भांडवली बाजारात निर्देशांकांची आपटी सुरू असताना सराफा बाजारातही मौल्यवान धातूंचे दर गुरुवारी कमालीने खाली आले. सोने दर तोळ्यामागे आता २९ हजारावर येऊन ठेपले आहेत. तर चांदीचे दरही किलोमागे जवळपास एक हजार रुपयांनी कमी झाल्याने ५५ हजार रुपयांच्या आत विसावले आहेत.
सराफा बाजारातील दरांची घसरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. १० गॅ्रम वजनासाठी सोने दर याच आठवडय़ाच्या सुरुवातीला ३० हजार रुपयांच्याही खाली आले होते. आता तर ते २९ हजार रुपयांनजीक आहेत. यामुळे मौल्यवान धातूंचे दर गेल्या सहा महिन्यात प्रथमच नीचांक पातळीवर आले आहेत. मुंबईत स्टॅण्डर्ड तसेच शुद्ध सोने दर तोळ्यामागे २५५ रुपयांनी घसरले. त्यामुळे पिवळ्या धातूला सराफा बाजारात अनुक्रमे २९,२२० व २९,३५५ रुपये भाव मिळाला. याचबरोबर चांदीचा भावही आज एकाच दिवसात किलोमागे थेट ९६० रुपयांनी घटून ५४,७३५ रुपयांवर आला.