एकाच व्यवहारात सव्वा वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदविताना सोने शुक्रवारी तोळ्यामागे २६ हजारांच्याही खाली आले. तर चांदीचे किलोचे दरही चार वर्षांच्या तळात आले आहेत.
शुक्रवारी मुंबईच्या सराफ बाजारात झालेल्या घाऊक व्यवहारात पांढरा धातू अर्थात चांदीचा किलोमागे भाव एकदम १,३०० रुपयांनी खाली आला. स्टॅण्डर्ड सोन्याचे १० ग्रॅमसाठीचे भाव ६२० रुपयांनी कमी होत २५,९६० रुपयांवर येऊन ठेपले. तर शुद्ध सोन्याचा याच वजनासाठीचा दरही याच प्रमाणात कमी होत २६,१०५ रुपयांवर स्थिरावला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा व्यवहारांसाठी मानबिंदू असलेल्या लंडनच्या बाजारात सोने प्रति औन्स प्रथमच १,२०० डॉलरखाली आल्याने येथेही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये कमालीची नरमाई पाहायला मिळाली आहे.
रुपया ९ पैशांनी भक्कम
मुंबई : भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण असताना चलन व्यासपीठावरही गेल्या पाच व्यवहारांत प्रथमच रुपयाने शुक्रवारी तेजी नोंदविली. सलग चार सत्रातील घसरणीनंतर रुपया डॉलरच्या तुलनेत ९ पैशांनी उंचावत ६१.३६ पर्यंत झेपावला. एकाच व्यवहारात सेन्सेक्समधील ५०० अंशांची वाढ व ८,३००च्या पुढील निफ्टी असा भांडवली बाजारात तेजीचा प्रवास नोंदला गेल्याने रुपयाला बळ दिले. डॉलररूपात विदेशी गुंतवणूकदारांनीही बाजारात १,७५० कोटी मूल्याची समभाग खरेदी केली. याचा परिणाम रुपया अमेरिकी चलनासमोर व्यवहारात ६१.३३ पर्यंत गेला. यापूर्वीच्या चार व्यवहारांत रुपया १८ पैशांनी घसरला आहे.

Story img Loader