दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या निमित्ताने सोन्याची खरेदी वधारण्याची शक्यता आहे. सोने खरेदीच्या वधारणेला यंदाच्या स्थिर दरांचे निमित्त पुढे केले जात आहे.
सोन्याचे दर गेल्या वर्षीच्या पाडवा तसेच दसऱ्याच्या तुलनेत यंदा कमीच आहेत. गेल्या वर्षी तोळ्याला ३० ते ३२ हजार रुपयांपर्यंत गेलेले सोन्याचे दर यंदाच्या मोसमात ३० हजार रुपयांपुढे फार गेलेले नाहीत.
दिवाळीच्या पहिल्या दिवशीही, सोमवारी सोने १० ग्रॅमसाठी शनिवारच्या तुलनेत अवघ्या ७५ रुपयांनी वधारले. स्टॅण्डर्ड सोन्याचा भाव तोळ्यासाठी २७,३१५ रुपये होता. परवाच्या गुरुपुष्यांमृतला पिवळ्या धातू दराने किरकोळ बाजारात २९ हजाराचा फेर धरताना काहीशी धास्ती निर्माण केली होती. तेव्हा ऐन लक्ष्मीपूजन अथवा त्याआधी, मंगळवारच्या धनत्रयोदशीलाही सोने खरेदीचा सध्याचा दरकल योग्य असल्याचा निर्वाळा सराफांकडून दिला जात आहे. तर चालू महिन्यातच ४२ हजार रुपयांपर्यंत गेलेला किलोभरच्या चांदीचा दरही तूर्त ४० हजार रुपयांच्या आतच आहे.
सध्याचे सोन्याचे दर त्याच्या उच्चांकापेक्षा १७ टक्क्य़ांनी कमी झाले आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीत गेल्या वर्षांत सोने दराने परतावा कमी दिला असला तरी सध्याच्या किमान दरांवर आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी ५ ते १० टक्के गुंतवणूक मौल्यवान धातू प्रकारात करण्यास हरकत नाही, असेही दलाल पेढय़ांमार्फत सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे कमी झालेले दर व परकी चलनातील स्थिरताही नजीकच्या दिवसात मौल्यवान धातूंच्या दरांवर सकारात्मक परिणाम करणारी ठरेल, असा सराफांचा होरा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा