नव्या संवत्सर २०६९ च्या मुहूर्तावर मंगळवारी सोन्याचे दर तोळ्यामागे ३२ हजार रुपयांखाली उतरले. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने प्रामुख्याने सोने तसेच नाणी खरेदी करण्याचा गुंतवणूकदारांचा कल होता. तरीही सोने दरात १० ग्रॅमसाठी १०० ते सव्वाशे रुपयांपर्यंतची घसरण दिसून आली. चांदीचे दरही किलोसाठी २८० रुपयांनी कमी होऊन ते ६१ हजारांवर आले आहेत.
शहरातील सराफा बाजारात सोन्याचे दर गेल्या काही दिवसांमध्ये १० ग्रॅमसाठी ३२ हजार रुपयांपर्यंत गेले होते. रविवारच्या धनत्रयोदशीच्या दिवशीही सराफ दालनांमध्ये सोने ३४ हजार रुपयांमध्ये (घटणावर, करांसहित) मिळत होते. तर चांदीचा दरही गेल्या काही दिवसांमध्ये ६२ हजारांच्या वर गेला होता. राजधानी दिल्लीतही चांदी ६५ हजार रुपयांपर्यंत गेली होती. सोने-चांदीतील खरेदीचे सत्र यंदाच्या सणांमध्ये सुरू झाले असून हा कल आणखी दोनेक महिने कायम असेल, असा विश्वास ‘ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’चे माजी अध्यक्ष अशोक मिनावाला यांनी व्यक्त केला. यंदाच्या मोसमात २५ ते ३० टक्क्यांपर्यंतची मौल्यवान धातूच्या विक्रीतील वाढ दिसून येईल, असेही ते म्हणाले. डिसेंबर २०१२ पर्यंत सोन्याचे दर तोळ्यासाठी ३३ हजार रुपयांपर्यंत जातील, असेही त्यांनी सांगितले.   

Story img Loader