भाव कमी होण्याबाबत साशंकता

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या ‘दसरा’सणाच्या निमित्ताने सोने खरेदीसाठी बाजारपेठेत उत्साह आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने किमान काही ग्रॅम सोने खरेदी करण्याची किंवा घडविलेले दागिने तयार करून घेण्याची परंपरा ग्राहकांनी यंदाही कायम ठेवली आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमुळे पारंपरिक दागिन्यांना पुन्हा एकदा मागणी आली असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले.
सोन्याच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव तोळ्यामागे २२ हजारापेक्षा आणखी खाली येतील, असे ग्राहकांना वाटत होते, पण तसे झाले नाही. भाव आणखी उतरण्याची शक्यता नाही उलट ते वाढतीलच, असे मुंबई सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुधीर पेडणेकर यांनी सांगितले.
मुहूर्ताला सोने खरेदी करण्याची परंपरा कायम आहे. सोन्याचे नाणे किंवा सोन्याची वळी खरेदी करण्याकडे अधिक कल असल्याचे सांगून पेडणेकर म्हणाले. सर्वसामान्य ग्राहकांकडून १ ते ५ ग्रॅम पर्यंतच्या नाण्यांना व वळ्यांना जास्त मागणी आहे.
पारंपरिक दागिन्यांना पुन्हा मागणी
पोहेहार, मोहनमाळ, गोफ, पाटल्या, बांगडय़ा, शाहीहार, गोठ आदी पारंपरिक दागिन्यांना पुन्हा एकदा मागणी आली आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील पौराणिक, ऐतिहासिक तसेच कौटुंबिक मालिकांमध्ये हे जुने दागिने पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्या दागिन्यांची पुन्हा ‘फॅशन’ आली आहे. हे सर्व दागिने २३ कॅरेट मध्ये तर अन्य विशेषत: कलाकुसर केलेले दागिने हे २२ कॅरेटमध्ये घडविण्याकडे ग्राहकांचा कल असतो, असेही सुधीर पेडणेकर यांनी सांगितले.
‘लागू बंधू’चे संचालक दिलीप लागू म्हणाले की, सोन्याचे भाव सध्या स्थीरच राहतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात काही फरक पडलेला नाही. सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे भारतीयांना कमी दरात सोने उपलब्ध होत आहे. सरकारच्या सोन्याशी निगडीत बचन योजना या वाढत्या सोने आयातीला आळा घालू शकतील आणि गुंतवणूकदारांना बचतीचा नवा पर्या उपलब्ध होईल.

सोन्याचे भाव सध्या स्थीरच राहतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात काही फरक पडलेला नाही. सरकारच्या सोन्याशी निगडीत बचन योजना वाढत्या सोने आयातीला आळा घालू शकतील आणि गुंतवणूकदारांना बचतीचा नवा पर्या उपलब्ध होईल.
’ दिलीप लागू,
‘लागू बंधू’चे संचालक.

Story img Loader