ऐन लग्नसराईत मौल्यवान धातू महाग
सोने रु. २९,६८० , चांदी रु. ५५,०२० (गुरुवारचे मुंबईतील बंद भाव)
तोळ्यासाठी ३० हजाराच्या खाली विसावलेले सोने पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात चांदी, हिरे आदींसह सोन्यासारख्या मौल्यवान धातूंवरील मूल्यवर्धित कर वाढविल्यामुळे सोन्याचे दर १० ग्रॅममागे ६० रुपयांपुढे वाढण्याची शक्यता आहे.
राज्याचा २०१३-१४ चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी सोने आदी धातूंवरील मूल्यवर्धित कर १ एक्क्यांवरून १.१० टक्के प्रस्तावित केला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरील आर्थिक उपाययोजनेसाठी करण्यात आलेल्या अन्य करवाढीच्या तरतुदींबरोबरच मौल्यवान धातूंवरील करवाढ वर्षभरासाठी मर्यादित असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यामुळे राज्यात सोने-चांदीचे दर आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सोने दर गेल्या अनेक दिवसांपासून तोळ्यासाठी ३० हजार रुपयांच्या आत स्थिरावले आहे. येत्या महिन्याच्या सुरुवातीला मराठी नववर्षांची (गुडीपाडवा) नांदी असतानाच लग्नसराईचा मौसमही सुरू होत आहे. अशा स्थितीत एप्रिलपासून होणाऱ्या वाढीव मूल्यवर्धित करांमुळे सोने दरांच्याबाबत अधिकच तेजाळणार आहे.
राज्यामध्ये वस्तू व सेवा कर तसेच स्थानिक स्वराज्य कर यांची अंमलबजावणी लवकरच पूर्णत: होत असताना सोन्यावरील करांमधील वाढ करण्याची आवश्यकता नव्हती, असे मत ‘रिद्धी सिद्धी बुलियन्स’चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी यांनी व्यक्त केले आहे. उलट सोने धातूंवर लावण्यात आलेल्या वाढीव करांमुळे या धातूंसह अन्यही मौल्यवान धातू राज्यात अधिक महाग होतील, असेही ते म्हणतात.
त्यांच्या अंदाजाने राज्यात मू्ल्यवर्धित कर, जकात आदी गृहित धरता किलोमागे सोने ६ हजार रुपयांनी महाग होईल. इतर राज्यांच्या तुलनेत ही वाढ अधिक असेल, असेही ते म्हणाले.
याशिवाय सोने आयातीवरही विपरित परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईसारख्या शहरातही सोने धातूची मागणी कमी होऊन त्याचा फटका रत्न व दागिने क्षेत्राला बसेल, असेही त्यांनी सांगितले. दागिने निर्मितीचे प्रमुख केंद्र गणले जाणाऱ्या मुंबई आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या बाबत हे नुकसानकारक असून प्रसंगी येथील उत्पादक कदाचित राज्याबाहेर पडण्याचाही विचार करतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.
गेल्या गुढीपाडव्यावरही दरवाढीचे संकट होते. सोने खरेदीच्या या मुहूर्तापूर्वीच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालिन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मौल्यवान धातूंवरील कर एक ते दोन टक्क्याने वाढविला होता. याविरोधात सराफ्यांनी पुकारलेला बंद तब्बल २० दिवस चालला होता. यामुळे तेव्हा सोने दर हजार रुपयांनी वधारले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा