चांदीही किलोसाठी ६० हजारांनजीक
दिवाळी जशी जवळ येत आहे तशी मौल्यवान धातूंचे दर अधिक चकाकत आहेत. चांदीसह मुंबईतही सोने दर मंगळवारी पुन्हा उंचावताना दिसले. गेल्या आठवडय़ात तोळ्यासाठी ३० हजार रुपयांच्या आत असलेले सोन्याचे दर १० गॅ्रमसाठी ३१ हजार रुपयांकडे कूच करू पाहत आहेत.
सोमवारच्या तुलनेत स्टॅण्डर्ड प्रकारचे सोने मंगळवारी कमी, १४० रुपयांनी वधारले असले तरी त्याचा भाव ३० हजार ७७५ रुपये नोंदला गेला. मुंबईच्या सराफा बाजारात शुद्ध सोनेही याच वजनासाठी १३५ रुपयांनी वधारत ३०,९१० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. सोमवारी सोने दरांमध्ये २५० रुपयांहून अधिक वाढ नोंदली गेली होती. आठवडय़ापूर्वी किलोसाठी ५९ हजार रुपयांवर असणाऱ्या चांदीचे दरही ६० हजार रुपयांपर्यत जाऊ पाहत आहेत. मंगळवारी शहरात चांदीचा किलोचा दर ५२५ रुपयांनी वाढून ५९,७२५ रुपये झाला. सोमवारी तो ४२० रुपयांनी वाढूनही ५९,२०० रुपयांपर्यंत गेला होता.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंचे दर अद्यापही किमान पातळीवर आहेत. भारतात मात्र सण-समारंभ आणि लग्नाचा मोसम असल्याने दिवाळीपर्यंत तरी दरांची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.