सोन्याने शुक्रवारच्या व्यवहारात १० ग्रॅममागे तब्बल ५०० रुपयांची झेप घेत २९ हजाराला स्पर्श केला. मौल्यवान लग्न मोसमामुळे सराफ्यांकडून धातूची मागणी नोंदली जात असल्याने सोने तसेच चांदीच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे.
स्टॅण्डर्ड प्रकारचे सोने दर शुक्रवारी तोळ्यासाठी ५२५ रुपयांनी वाढून २९ हजाराच्या उंबरठय़ावर, २८,९४५ रुपयांवर स्थिरावले. तर शुद्ध सोन्याचा याच वजनासाठीचा दर याच प्रमाणात वाढत २९ हजारांपुढे गेला. तेथे ते २९,०९५ रुपयांपर्यंत स्थिरावले.
चांदीच्या दरातही शुक्रवारी मोठी- किलोमागे ३९५ रुपयांची वाढ झाल्याने पांढरा धातू ३७,६९० रुपयांपुढे गेला. गुरुवारी त्याचा स्तर ३७,३०० रुपयांच्या आत होता. नवी दिल्लीतही सोने दराने शुक्रवारी २९ हजारापुढील पल्ला गाठला. राजधानीत सोने गेल्याच आठवडय़ात महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले होते.

ग्रीस, जपान, अमेरिकेतील अस्वस्थ अर्थ हालचाली आणि भांडवली बाजार, चलन विनिमय मंच येथील अस्थिरतेच्या वातावरणात पुन्हा एकदा मौल्यवान धातू पसंतीचा पर्याय बनू पाहत आहे. खनिज तेलाच्या दरात सुधार आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोने मूल्यवाढ नोंदवीत आहे. गेल्या दहा दिवसात तर सोने प्रति औन्स १२५० डॉलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे येथे त्याचा परिणाम उमटणे स्वाभाविकच आहे. त्यातच मौल्यवान धातूसाठी आता लग्नाचा मोसम महत्त्वाचा आहे.
 अमित मोडक,
कमॉडिटी तज्ज्ञ, पु. ना. गाडगीळ आणि सन्स

Story img Loader