गेल्या अनेक महिन्यांपासून प्रति तोळा ३० हजारांपुढील दौड कायम ठेवणाऱ्या सोन्याने गुरुवारी प्रथमच हा स्तर सोडला. मुंबईच्या सराफ बाजारात स्टॅण्डर्ड प्रकारचे सोने १० ग्रॅमसाठी एकदम ३८१ रुपयांनी कमी होत २९,६५० रुपायंवर विसावले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत व्याजाच्या दरवाढीचे तेथील मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हने दिलेल्या संकेताच्या परिणामी, सेन्सेक्ससह निफ्टी पंधरवडय़ाच्या नीचांकावर बंद झाले.  तर डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाने गुरुवारच्या व्यवहारात गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात मोठी आपटी नोंदविली.
सलग तीन दिवसांतील तेजी सेन्सेक्सने गुरुवारी ९२.७७ अंशांनी मोडून मुंबई निर्देशांकाला २१,७४०.०९ वर आणून ठेवले. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही याच सत्रातील ४०.९५ अंश घसरणीमुळे ६,५००चा स्तर मोडत, ६,४८३.१०पर्यंत येऊन थांबला. आर्थिक उपाययोजनेसाठीचे वित्तीय सहकार्य आटोपते घेतल्यानंतर व्याज दरवाढीचा फेरा सुरू होईल, या फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांच्या संकेताने दोन्ही निर्देशांक ६ मार्चनंतरच्या किमान स्तरावर आले.
एकाच व्यवहारात तब्बल ३९ पैशांची आपटी घेत रुपया गुरुवारअखेर ६१.३४ पर्यंत घसरला. चलनाची ०.६४ टक्के घसरण ही गेल्या दोन महिन्यांतील सर्वात मोठी ठरली. गेल्या काही सत्रांपासून सतत ६१च्या खाली गेलेला डॉलरच्या तुलनेतील रुपया बुधवारी ६०पर्यंत उंचावला होता. चलनाने यापूर्वी २७ जानेवारीला तब्बल ४४ पैशांची मोठी आपटी नोंदविली आहे.
बरोबरीने चांदीच्या दरातही किलोमागे थेट ७५६ रुपयांची घट होत ४५,३०० रुपयांचा भाव मिळाला. जागतिक स्तरावरही सोन्याने दिवसातील सर्वात मोठी आपटी राखत गेल्या तीन आठवडय़ांतील किमान स्तरावर प्रवास करणे पसंत केले आहे. लंडनच्या बाजारात सोने प्रति औन्स १,३२५.३४ डॉलरवर व्यवहार करत आहे.
सोने आयात शिथील
चालू खात्यावर भार पडू नये म्हणून सोन्यावरील शुल्क कमी करण्याची व्यापाऱ्यांची मागणी धुडकावणाऱ्या सरकारने सोने आयातीचा नियम काहीसा शिथील केला आहे. देशातील पाच आघाडीच्या खासगी बँकांना सोने आयात करण्यास माध्यमातून परवानगी देण्यात आली आहे. एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि येस बँक यांचा यामध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त सध्या तीन सार्वजनिक बँकांना सोने आयात करण्यास परवानगी आहे. डॉलरमध्ये मौल्यवान धातूची आयात गेल्या महिन्यात २८.१५ टन झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा