पीटीआय, नवी दिल्ली : बुडीत कर्जे कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे फलित म्हणजे, सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांनी त्यांच्या नफाक्षमतेत ५० टक्के वाढ नोंदवली आणि सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत २५,६८५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा या बँका कमावू शकल्या, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी येथे केले.
विद्यमान आर्थिक वर्ष २०२२-२३च्या पहिल्या सहामाहीत, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील सर्व १२ बँकांचा एकत्रित निव्वळ नफा ३२ टक्क्यांनी वाढून ४०,९९१ कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत भारतीय स्टेट बँकेने १३,२६५ कोटी रुपयांचा सर्वाधिक नफा नोंदवला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत या बँकेच्या नफ्यात यंदा तब्बल ७४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) अर्थात बुडीत कर्जे कमी करण्यासाठी आणि सरकारी बँकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी सरकारच्या सतत सुरू राहिलेल्या प्रयत्नांचे आता ठोस परिणाम दिसून येत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व १२ बँकांनी दुसऱ्या तिमाहीत २५,६८५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा घोषित केला आणि आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते सप्टेंबर सहामाहीत हा नफा एकूण ४०,९९१ कोटी रुपयांवर गेला आहे. वार्षिक तुलनेत बँकांच्या नफ्यातील ही वाढ अनुक्रमे ५० टक्के आणि ३१.६ टक्के अशी आहे, असे सीतारामन यांनी सोमवारी ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले.
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीच्या कॅनरा बँकेच्या नफ्यात वार्षिक तुलनेत ८९ टक्क्यांनी वाढ होऊन तो २,५२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोलकातास्थित यूको बँकेच्या नफ्यात तर १४५ टक्क्यांनी वाढ होऊन तो ५०४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर दुसऱ्या तिमाहीत बँक ऑफ बडोदाचा नफा ५८.७० टक्क्यांनी वाढून ३,३१२.४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे त्यांनी दुसऱ्या एका ट्वीटमधून माहिती दिली.
सरकारी मालकीच्या १२ पैकी दोन – पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात ९-६३ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. या बँकांच्या घटत्या नफ्याला बुडीत कर्जासाठी उच्च तरतुदी कारणीभूत आहेत. त्या उलट दुसऱ्या तिमाहीत दहा बँकांनी १३ ते १४५ टक्क्यांपर्यंत नफा नोंदवला आहे. युको बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी मागील आर्थिक वर्षांच्या याच तिमाहीच्या तुलनेत यंदा १४५ टक्के आणि १०३ टक्के अशी निव्वळ नफ्यात वाढ नोंदवली आहे.