तुटीच्या पावसामुळे भविष्यातील अन्नधान्यांची संभाव्य भाववाढ आणि महागाई दराच्या अनिश्चिततेबाबत खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलेल्या साशंकतेचा परिणाम केंद्र सरकारच्या कर्जरोख्यांच्या किमती घसरण्यात आणि त्यांच्या परताव्याच्या दरात विलक्षण वाढ होण्यात झाला आहे. बुधवारी रोखे बाजाराच्या कामकाजाच्या सत्रात जुलै २०१४ मध्ये मुदतपूर्ती असलेल्या रोख्यांचा परताव्याचा दर ८.१० टक्क्य़ांवर पोहोचला.
‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवीत सादर झालेला अर्थसंकल्प व त्याला जोडून रिझव्‍‌र्ह बँकेकडून झालेल्या व्याज दर कपातीनंतर केंद्र सरकारच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचा परताव्याचा दर ७.६८ टक्क्य़ांपर्यंत घसरला होता; परंतु हवामान खात्याकडून व्यक्त झालेल्या अपुऱ्या पावसाचे भाकीत आणि महागाई दरात वाढीच्या टांगत्या तलवारीबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेल्या चिंतेतून सरकारच्या रोख्यांच्या किमती निरंतर घसरत चालल्या आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या महिन्यात विक्री केलेल्या आणि मे २०२५ मध्ये मुदतपूर्ती असलेल्या रोख्यांचा परताव्याचा दर गेल्या तीन आठवडय़ांत ७.६४ टक्क्य़ांवरून ७.८८ टक्के असा वाढत आला आहे.
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात किरकोळ किमतींवर आधारित महागाई दरात ४.८७ टक्क्य़ांवरून वाढ होत तो ५.०१ टक्के झाला. महागाई दरात झालेली ही वाढ रोखे गुंतवणूकदारांच्या पचनी न पडलेली दिसत नाही.

Story img Loader