प्राप्तीकर विवरणपत्राच्या (रिटर्न्‍स) अर्जाच्या नवीन नमुन्यांचा संच जारी करण्यात आला आहे. २०१४-१५ करनिर्धारण वर्षांसाठी भरावयाचे हे अर्ज तुलनेने सोपे आहेत. अर्थमंत्रालयाने याबाबत कालच आदेश जारी केला असून ३१ ऑगस्ट ही प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
व्यक्तिगत करदाते व संयुक्त हिंदू कुटुंबातील व्यक्तींनी ‘आयटीआर २ ए’ हा अर्ज भरायचा आहे. ज्या करदात्यांना व्यवसाय, उद्योगातून उत्पन्न नसेल, म्हणजेच नोकरदारांना हा अर्ज भरावा लागेल. पारपत्र (पासपोर्ट) मिळविले असेल, तर क्रमांक लिहावा असे त्यात नमूद केले आहे. तथापि विदेशी वारीचा तपशिल देणे बंधनकारक नाही.
मागील वर्षांतील बँकेतील चालू स्थितीतील खाती (बंद खाती सोडून), एकूण बचत हा तपशील करदात्याला  अर्ज भरताना द्यावयाचा आहे. बँकेचा आयएफएससी संकेतांक द्यावा लागणार आहे. शिवाय आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेखही करावा लागणार आहे. ईमेल आयडी दोन असतील तरी त्यांचा उल्लेख करता येईल.
ज्यांना व्यवसाय व उद्योगातून उत्पन्न आहे त्यांनी ‘आयटीआर २’ हा अर्ज भरावयाचा असून त्यात परदेशी मालमत्ता किंवा भारताबाहेरील मालमत्तेचे स्रोत लिहावे लागणार आहेत.

Story img Loader