थकीत करांच्या वसुलीसाठी महसुल विभाग किंगफिशर एअरलाइन्स भोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. कर्जाच्या विळख्यातील या कंपनीकडून कर विभागाला २०० कोटी रुपये येणे आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय उत्पादन तसेच सीमाशुल्क मंडळाने करवसुलीसाठीच्या आराखडय़ावर सध्या कामकाज सुरू असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. करांपोटी कंपनीकडून देय असलेल्या रकमेची जुळवणी करून हा आकडा २०० कोटी रुपयांच्या घरात गेला असल्याचे सांगण्यात आले. ‘कंपनीची बँक खाती यापूर्वीच गोठविण्यात आली असून सेवाकरापोटी जेवढी म्हणून रक्कम आहे ती वसुल करण्यासाठी सर्व ती पावले उचलले जातील’, असे केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी सांगितले. याबाबतचे निर्देश खुद्द केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दोन्ही मंडळांना दिले आहेत. दरम्यान, हिस्सा विक्रीच्या चर्चेने किंगफिशरचा समभाग मंगळवारी दिवसभरात तब्बल ४ टक्क्यांनी वधारत १४ रुपयांनजीक पोहोचला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा