कर चुकवेगिरीचा मागोवा घेण्यासाठी सहाय्यकारी आता ‘स्मार्ट’ पद्धती अस्तित्वात येणार असून, तसे संकेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिले आहेत. चालू वर्षअखेर ही यंत्रणा अस्तित्वात येऊन त्याची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून सुरू  होईल.
कर चुकवेगिरी करताना जशा क्लृप्या, युक्त्या योजल्या जातात, तशाच चलाख पद्धतीने आता कर चुकवेगिरी हेरली जाणार असल्याचे प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षा अनिता कपूर यांनी सांगितले. प्राप्तिकर चुकविणाऱ्यांसाठी या अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीची रचना असेल, असेही त्या म्हणाल्या.
करदाते तसेच कंपन्या यांचे सर्व वैयक्तिक वित्तीय व्यवहार या नव्या व्यासपीठावर उपलब्ध होणार असून यातून कर चुकविला जातो का ते तपासणे सुलभ होणार आहे, असे कपूर यांनी सांगितले. व्यक्ती, संस्था, कंपन्यांद्वारे गोळा होणाऱ्या कराची या प्रणालीत इत्थंभूत माहिती असेल, असे त्यांनी सांगितले.
कर न भरणाऱ्यांना केवळ दंड करून अथवा थकीत करांची वसुली करणे एवढेच उद्दिष्ट राहता कामा नये, असे स्पष्ट करून कपूर यांनी कर चुकवेगिरी हा केवळ धोकाच नाही तर ती त्यामार्फत देशातील संपूर्ण अनुपालन संस्कृतीच दूषित होत आहे, असे त्या म्हणाल्या. करांबाबत तक्रार करणाऱ्यांना याबाबतची पद्धतीच गैर आहे, असे वाटते, हेही खेदकारक आहे, असे त्यांनी नमूद केले.