केवळ अन्नधान्याचाच महागाईचा दर चढा नसून महागाई निर्देशांकातील अन्य घटकांचे दरही चढेच आहेत. महागाईचा दर समाधानकारक पातळीवर आल्यानंतरच व्याजदर कपातीबाबत विचार करणे योग्य ठरेल, असे वक्तव्य रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोमवारी मुंबईत केले.
‘फिक्की’च्या वतीने आयोजित बँक विषयावरील परिषदेत ते बोलत होते. मध्यवर्ती बँकेचे पतधोरण महिनाअखेरीस येऊ घातले असतानाच गव्हर्नरांनी व्याजदर कपातीबाबत साशंकता निर्माण केली आहे. शुक्रवारीच ऑगस्टमधील किरकोळ महागाई दर कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली. तर सोमवारी याच कालावधीतील घाऊक किंमत निर्देशांक गेल्या पाच वर्षांतील किमान पातळीवर आला. यामुळे व्याजदर कपातीबाबत उंचावलेल्या आशा गव्हर्नरांच्या वक्तव्याने धुळीला मिळाल्या आहेत.
डॉ. राजन परिषदेदरम्यान म्हणाले की, रिझव्‍‌र्ह बँकेला गरज नसताना व्याजदर चढे ठेवण्यात स्वारस्य नाही; परंतु महागाई डोके वर काढण्याची शक्यता अद्यापही मावळली नसताना व्याजदर कपात करण्यात काय अर्थ आहे? सध्याच्या परिस्थितीत रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई कमी होण्यासाठी आखलेली धोरणे योग्य असल्याची ग्वाही राजन यांनी या वेळी दिली. उद्योग जगताकडून व्याजदर कपातीच्या होत असलेल्या मागणीवर, तुम्ही किमतीत जर कपात केली नाही तर महागाई कमी कशी होईल, असेही ते म्हणाले.
महागाई
किरकोळ महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशक्तीच्या पातळीवर येत नाही तोपर्यंत व्याजदर कपातीची आशा धूसर आहे. रिझव्‍‌र्ह बँकेला एकूण महागाईपेक्षा अन्नधान्याच्या वाढत्या दरांची चिंता अधिक आहे. बँकेने जानेवारी २०१५ पर्यंत ८ टक्क्य़ांच्या आतील सीमा आखली आहे.
विकास
चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकास दर ५.७ टक्क्य़ांवर गेला आहे. केंद्र सरकारने एकूण वर्षांसाटी ५.४ ते ५.९ टक्के विकास दराचे उद्दिष्ट राखले आहे. गेल्या सलग दोन वर्षांत विकास दर ५ टक्क्य़ांच्या खालीच राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा