केंद्र सरकारने ब्राझील आणि पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या स्वस्त साखरेला पायबंद घालण्यासाठी, तिच्यावरील आयात शुल्क सध्याच्या १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. यातून प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील साखर उत्पादकांना ऊस शेतक ऱ्यांची थकलेली ९००० कोटी रुपयांची देणी भागविता यावीत, असा सरकारचा उद्देश असला तरी जनसामान्यांना मात्र महागलेल्या साखरेचे कडवट घोट पचवावे लागणार आहेत.
सहकारी साखर कारखाने आणि ऊस शेतक ऱ्यांच्या मागणीला अनुसरून सरकारने हे पाऊल टाकले आहे. किंबहुना या मंडळींना साखरेवरील आयात शुल्कात ३०-४० टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित होती.
साखर उत्पादनातील देशातील अग्रणी उत्तर प्रदेशमधील अनेक साखर उत्पादकांची तक्रार होती की, उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात त्यांना घाऊक बाजारात साखर विकावी लागत असून, त्यापायी ऊस शेतक ऱ्यांची देणीही त्यांना भागविता आलेली नाहीत. मागणीपेक्षा जास्त उत्पादन होऊनही एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती ओसरल्याने निर्यातीचा मार्ग बंद झाला, तर उत्पादन खर्च किलोमागे ३६ रुपये असताना, जवळपास ४ ते ५ रुपये प्रतिकिलो नुकसान सोसून साखर विकावी लागत आहे, अशी उत्तर प्रदेशच्या कारखानदारांची व्यथा आहे. महाराष्ट्रातही २०१२ सालात साखर कारखानदारांची प्रतिक्विंटल प्राप्ती रु. ३३२८ वरून सध्या क्विंटलमागे २८०० रुपयांवर ओसरली आहे. तथापि बाजारात साखरेच्या किमती वाढविण्याला अडसर हा मुख्यत: स्वस्त आयातीत साखरेचा होता, तोच आता दूर होणार असल्याने साखरेची किरकोळ विक्री किंमत ४५ रुपयांच्या पल्याड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा विश्लेषकांचा कयास आहे.
चालू वर्षांत आयात केल्या गेलेल्या साखरेचे प्रमाण ५ लाख टनांवर गेल्याचा अंदाज आहे. जागतिक स्तरावर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाबरोबर ब्राझीलचे चलन रियालची तीव्र स्वरूपात घसरण झाली असून, आयात शुल्कात ५ टक्क्यांच्या वाढीने इच्छित परिणाम साधला जाणार नाही. त्यामुळे आयातीला खरोखर पायबंद घालायचा झाल्यास आयातशुल्क ३०-४० टक्क्यांच्या घरात वाढायला हवे, असे ‘इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ या साखर-उत्पादकांच्या शिखर संघटनेने म्हटले आहे.
साखर समभागांना मात्र गोडवा!
(बीएसई बंद भाव, ९ जुलै)
* द्वारिकेष शुगर रु. २४.४५ (+६.३०%)
* बलरामपूर चिनी रु. ४१.१५ (+४.८४%)
* शक्ती शुगर्स रु. १६.०२ (+४.७७%)
* धामपूर शुगर रु. ३८.८० (+३.७४%)
* बजाज हिंदुस्थान रु. १५.७० (+२.६८%)
* ईआयडी पॅरी इंडिया रु. १४२.५५ (+२.१९%)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा