प्रमुख धोरण दर जैसे थे ठेवत भविष्याबाबत भयकारक संकेत देणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या आवाहनाला लागलीच प्रतिसाद देत, चालू खात्यातील तुटीला आवर घालण्यासाठी येत्या आठवडय़ात काही ठोस पावलांची घोषणा केली जाईल अशी सरकारने ग्वाही दिली.
चालू खात्यातीत गंभीर बनलेल्या तुटीचीच स्थानिक चलनाच्या मूल्याला झळ पोहचत असल्याचे नमूद करीत भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांनी सांगितले की, ‘‘थेट विदेशी गुंतवणुकीत शिथिलतेचे पाऊल आधीच टाकले गेले असून, त्याशिवाय चालू खात्यातील तुटीवर नियंत्रणासाठी अन्य काही पर्याय अजमावले जातील आणि त्याची घोषणा येत्या काही आठवडय़ात केली जाईल.’’ रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनीही आज तिमाही पतधोरण आढाव्याचे निवेदन करताना, चिंताजनक बनलेल्या चालू खात्यातील तुटीवर नियंत्रणासाठी सरकारकडून तातडीने उपाय योजले जावेत, असे मत व्यक्त केले.
या संबंधाने उपलब्ध असलेल्या पर्यायांबाबत बोलताना डॉ. राजन यांनी निर्यातीत वाढीसाठी भरपूर प्रोत्साहनांची युद्धपातळीवर अंमलबजावणीचा मार्ग अजमावला जाईल, असे सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेकडेही रुपयाला सावरण्यासाठी अजूनही अनेक आयुधे आहेत, असे सुचवीत डॉ. राजन यांनी ‘‘सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेचे रुपयाच्या स्थिरतेसाठी सुरू असलेल्या संयुक्त प्रयत्नांबाबत शंकेला जागा असू नये,’’ अशी स्पष्टोक्तीही केली.
बाह्य जगतात अर्थव्यवस्थेची स्थिती कशीही राहिली तरी भारतात विद्यमान आर्थिक वर्षांत चालू खात्यातील तुटीत लक्षणीय कपात केली जाईल, याबद्दल राजन यांनी विश्वास व्यक्त केला. ब्रिटन आणि अमेरिकेत अर्थव्यवस्था जितक्या लवकर उभारी घेतील तितक्या वेगाने ही तूट घसरत जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सरकारकडून जी काही पावले टाकली जातील ती स्थिर आणि चिरंतन स्वरूपाचीच असतील, अशी त्यांनी ग्वाही दिली.  

Story img Loader