चालू खात्यातील तूट विस्तारण्यास कारणीभूत ठरलेल्या मौल्यवान धातूच्या वाढत्या हव्यासाला र्निबध म्हणून सोने-चांदीच्या दरांवर पुन्हा एकदा वाढीव शुल्काचा बडगा उगारण्यात आला आहे. यापूर्वी वेळोवेळी आयात शुल्क वाढूनही जुलैमध्ये सोन्या-चांदीची वाढती आयात कायम राहिल्याने यंदा हे शुल्क थेट १० टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे. परिणामी, धातूंच्या दरांनी झेप घेणे सुरू केले असून ही चमक ऐन सणांच्या मोसमात कायम राहण्याची भीती व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
गेल्या आर्थिक वर्षांत ऐतिहासिक उच्चांकावर गेलेल्या चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी सोने-चांदीसारखी अनावश्यक आयात कमी करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सोमवारीच सूतोवाच केले होते. यानुसार ८ टक्क्यांवरून आयात शुल्क १० टक्के करण्याचा निर्णय आज घोषित करण्यात आला. गेल्या आठ महिन्यातील ही तिसरी शुल्क वाढ आहे. याचबरोबर सोन्याच्या वीटेवरील आयात शुल्कही ७ टक्क्यांवरून वाढवून ९ टक्के करण्यात आले आहे. सोन्याबरोबरच चांदीवरील आयात  शुल्कही ६ टक्क्यांवरून एकदम १० टक्के करण्यात आले आहे. जुलैमध्ये मौल्यवान धातूची २.९ अब्ज डॉलरची आयात झाली आहे. तत्पूर्वीच्या महिन्यात ती कमी होऊन २.४५ अब्ज डॉलर झाली होती. त्यामुळेच त्यावेळी वाढीव शुल्काची शक्यता अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावली होती. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील मौल्यवान धातूंची एकूण आयात ३३५.५ अब्ज टन झाली आहे.

भावात ६०० रुपयांनी भडका
चालू सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव तेजाळत आहेत. त्यातच १० टक्क्यांपर्यंत वाढीव आयात शुल्क लावल्याने स्टँडर्ड सोन्याच्या प्रति १० ग्रॅम एकदम ६०० रुपयांनी भडका होणार आहे. मंगळवारीच मुंबईतील सराफा बाजारावर याचे परिणाम दिसून आले. शहरात स्टॅण्डर्ड सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी २७० रुपयांनी वाढून २९,५२० रुपये झाला, तर शुद्ध सोनेही तोळ्यासाठी २६० रुपयांनी वधारून २९,६६० रुपये झाले. चांदीचा भाव किलोमागे एकदम १,९२० रुपयांनी वाढून तो ४७,०३५ रुपये झाला. वाढीव शुल्काचा आयात रोखण्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा व्यावसायिकांनी केला आहे. त्यासाठी जेव्हा २ टक्के शुल्क होते तेव्हा आयात कमी होती; उलट ते वाढविण्यात आल्यापासून आयातही वाढली असल्याचे दाखले दिले जात आहे. वाढीव शुल्कामुळे सरकारला मार्च २०१४ अखेपर्यंत ७९ कोटी डॉलरचा अतिरिक्त महसूल मिळेल.

Story img Loader