वर्षांनुवर्षे तोटय़ात असलेले सरकारी उपक्रम बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ५५ पैकी ४६ उपक्रमांची पुनर्रचना करण्याचा तर उर्वरित नऊ उपक्रमांना कायमस्वरूपी टाळे ठोकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यात घडय़ाळांची निर्मिती करणाऱ्या एचएमटी वॉचेस या कंपनीचाही समावेश आहे. तोटय़ात असलेली तसेच पुनपुन्हा प्रयत्न करूनही पुन्हा उभारी घेऊ न शकणारे आजारी उपक्रम बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वर यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. एचएमटी वॉचेसला तब्बल तीन हजार १३९ कोटी रुपयांचे वार्षिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे एचएमटी वॉचेसबरोबरच एचएमटी बेअरिंग्ज, तुंगभद्रा स्टील प्रॉडक्टस, हिंदुस्थान फोटो फिल्म्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, एचएमटी चिनार वॉचेस, हिंदुस्थान केबल्स व स्पाइस ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड हे सार्वजनिक उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सिद्धेश्वर यांनी सांगितले.