वाढत्या महागाईबरोबरच शिक्षणावरील खर्चही गेल्या दोन ते तीन वर्षांत तब्बल पाचपट वाढला असून मध्यम तसेच अल्प उत्पन्न गटाकडूनही दुहेरी आकडय़ातील शैक्षणिक कर्जासाठीची मागणी वाढली आहे. नोकरीची हमी देणाऱ्या अभ्यासक्रमासाठीदेखील शैक्षणिक कर्जाची विचारणा होत असून परदेशी शिक्षणाचा सारा खर्च मासिक हप्त्यावर भागविण्याकडे कल वाढला आहे.
भारतासारख्या देशात शिक्षणावर वर्षांला ८०,००० कोटी रुपये खर्च होतो. पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडित शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. येथून शिक्षण घेऊन परदेशात जाणाऱ्या विद्याथ्यरंची संख्याही वर्षांला २.५ ते ३ लाख आहे.
नोकरीची हमी असणाऱ्या अभ्यासक्रमाचा खर्चही दोन ते अडिच लाख रुपयांच्या घरात जातो. तर परदेशातील शिक्षणावरचा वर्षांचा खर्च ३० लाख रुपयांपर्यंत होतो.
खासगी गृह वित्त क्षेत्रातील आघाडीच्या डीएचएफएलची शैक्षणिक कर्ज पुरवठादार कंपनी असलेल्या अवान्से एज्युकेशन लोन्सने चार महिन्यांपूर्वीच या क्षेत्रात पदार्पण केले. कंपनीने गेल्या दोन महिन्यात शैक्षणिक नगरी पुण्यातही विस्तार केला. विविध अभ्यासक्रमासाठी मागणी असलेल्या नवी दिल्ली परिसरातही अस्तित्व निर्माण केले.
‘पूर्वेतील ऑक्सफर्ड’ अशी ओळख असलेल्या पुण्यात १६० हून अधिक शैक्षणिक संस्था आहेत. भारतासह विदेशांतील १.५० लाख विद्यार्थी येथे पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतात. नवी दिल्ली परिसरात हेच प्रमाण १०० शैक्षणिक संस्था आणि वर्षांला ४० हजार विद्यार्थी आहे.
गृह वित्त पुरवठय़ासाठी दहा ते पंधरा वर्षांसाठी असलेला प्रतिसाद सध्या शैक्षणिक कर्जाच्या बाबत पहायला मिळतो, असे निरिक्षण अवान्से एज्युकेशन लोन्सच्या व्यवसाय प्रमुख नीरज सक्सेना यांनी ‘लोकसत्ता’कडे नोंदविले.
अडिच लाख रुपयांच्या घरातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या शुल्कासह एक कोटी रुपयांपर्यंत येणाऱ्या विदेशी पदवी/ पदव्युत्तर शिक्षणासाठीही कर्ज मागणी नोंदली जाते, असेही ते म्हणाले.
अवान्सेद्वारे शैक्षणिक शुल्क आणि निगडित इतर खर्चासह १०० टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत कंपनीचा कर्ज व्याजदर अधिक असला तरी अवघ्या चार दिवसात शैक्षणिक कर्ज मंजुरीची प्रक्रिया पार पाडली जाते. चार महिन्यांच्या कालावधीत कंपनीने ७५ ते ८० कर्ज प्रकरणे हाताळली आहेत.
नव्या शैक्षणिक वर्षांसाठी कंपनीने १५० ते २०० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट राखल्याचे अवान्से एज्युकेशन लोन्सच्या व्यवसाय प्रमुख नीरज सक्सेना यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. यामार्फत २,५०० ते ३,००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज पुरवठा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पुणे, दिल्लीसह मुंबई, बंगळुरु, हैदराबादसारख्या शहरांमध्ये स्वत:चे केंद्र सुरू करण्याबरोबरच अवान्सेला पालक कंपनी डीएचएफएलच्या ४४७ अस्तित्व केंद्राचा मोठा हातभार शैक्षणिक कर्ज वितरित करण्यासाठी लाभत आहे. कंपनी नजीकच्या कालावधीत महाराष्ट्रातील नागपूरसह चेन्नई, अहमदाबाद येथेही ही सुविधा उपलब्ध करून देत आहे.

Story img Loader