मुंबई : चालू आर्थिक वर्षांत देशाची अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढ साधेल. तसेच आगामी वर्षांतदेखील हाच विकास वेग कायम राहील, असा आशावाद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी आयोजित ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कार वितरण सोहळय़ात व्यक्त केला.
‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कार सोहळय़ात उपस्थितांना संबोधित करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, सरकारचा अंदाज सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर आधारित असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनेदेखील पुढील दोन आर्थिक वर्षांसाठी जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताचीच असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. रिझव्र्ह बँकेनेदेखील २०२२-२३ मध्ये देशाचा विकासदर ८.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. बँकिंग क्षेत्रातील निपुण कामगिरीचा गौरवार्थ दरवर्षी इंडियन एक्स्प्रेस समूहातील ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या अर्थविषयक दैनिकाकडून आयोजन केले जाते. जागतिक पातळीवरील प्रतिकूल घडामोडी आणि भू-राजकीय अस्थिरतेमुळे सध्या आव्हानात्मक परिस्थिती आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्याचीच परिणती म्हणून निर्यातीत घसरण झाली असल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच निवडणुकीपूर्वी प्रलोभने आणि आश्वासने देणाऱ्या राजकीय पक्षांवरदेखील आसूड ओढला. त्यावर चर्चेची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. निवडणुकांमध्ये मोफत सुविधांचा किंवा नि:शुल्क वीज यांसारख्या घोषणा केल्या जातात आणि त्याचे दुष्परिणाम वीज कंपन्यांना भोगावे लागतात.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते शुक्रवारी
‘एफई बेस्ट बँक्स’ सोहळय़ात वितरित झालेले पुरस्कार
जीवन गौरव पुरस्कार : केकी मिस्त्री
उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी, एचडीएफसी लि.
बँकर ऑफ द इयर :
* पद्मजा चंदुरू (वर्ष २०१९-२०)
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी, एनएसडीएल (तत्कालीन इंडियन बँकेच्या प्रमुख)
* संदीप बक्षी (वर्ष २०२०-२१)
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी, आयसीआयसीआय बँक