नवी दिल्ली : देशातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनाने ऑक्टोबर महिन्यात १.५२ लाख कोटींचा टप्पा गाठल्याचे अर्थमंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. सरलेल्या महिन्यातील कर संकलन, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १६.६ टक्क्यांनी वाढले असून, सलग आठव्या महिन्यात त्याने १.४० लाख कोटींपुढे मजल कायम राखली आहे.
दसरा-दिवाळी असा मुख्य सणांचा हंगाम तसेच वस्तू व सेवांच्या दरवाढीसह, त्यांची बळावलेली मागणी आणि व्यापाऱ्यांकडून वाढलेले कर-अनुपालन याच्या एकत्रित परिणामामुळे ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनाने दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. चालू आर्थिक वर्षांत दुसऱ्यांदा एकूण संकलन दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. या आधी चालू वर्षांत एप्रिलमध्ये एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. तर गेल्या वर्षी याच महिन्यात, म्हणजेच ऑक्टोबर २०२१ मध्ये १.३० लाख कोटींचा करापोटी महसूल मिळाला होता.
चालू वर्षांत मार्च महिन्यापासून जीएसटी संकलन हे निरंतर १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. ऑक्टोबरमधील एकत्रित १,५१,७१८ कोटी रुपयांच्या जीएसटी महसुलामध्ये, केंद्रीय जीएसटीपोटी रक्कम २६,०३९ कोटी रुपये, राज्य जीएसटी म्हणून ३३,३९६ कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटीपोटी ८१,७७८ कोटी रुपये (आयात वस्तूंवर मिळालेल्या ३७,२९७ कोटी रुपयांसह) आले आहेत, तर उपकर संकलनाची रक्कम १०,५०५ कोटी (आयातीवर मिळालेल्या ८२५ कोटी रुपयांसह) इतकी होती, असे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
सात महिन्यांत १०.४२ लाख कोटींचा महसूल
या आधीच्या महिन्यांत म्हणजे सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन हे १.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. चालू २०२२-२३ आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते ऑक्टोबर सात महिन्यांत केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून १०.४२ लाख कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक १.६८ लाख कोटींचा विक्रमी महसूल मिळाला होता, तर मासिक सरासरी १.५५ लाख कोटी रुपये महसूल मिळाला आहे.