विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्रातील आघाडीची हॅवल्स इंडिया कंपनीने देशातील ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘स्मार्ट सिटी’ प्रोत्साहनाला अधिक बळ देण्याच्या दृष्टिने आपल्या प्रकल्पातील उत्पादन वाढीसह ऊर्जा बचतीची अधिक उपकरणे सादर करण्याचा विडा उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीने नीमराना प्रकल्पात एलईडी तंत्रज्ञानावरील नव्या दिव्यांच्या निर्मितीसह वॉटर हिटर व एअर कूलर या उत्पादनांची नवी श्रेणीही साकारली आहे.
समूहाच्या देशांतर्गत व्यवसायात ६० टक्के हिस्सा राखणाऱ्या ८,००० कोटी रुपयांच्या हॅवल्स इंडियाचे फॅन, केबल तसेच दिवे सध्या विशेष लोकप्रिय आहेत. सीएफएल दिव्यांमध्ये उल्लेखनीय बाजारपेठ पादाक्रांत केल्यानंतर कंपनीने आता एलईडी दिवे निर्मितीत विस्तार केला आहे. याअंतर्गत लोकप्रिय सीएफएलपेक्षा ५० टक्के अधिक ऊर्जा बचत देणाऱ्या पहिल्या तेजोमय ल्युमेनो एलईडी दिव्यांची निर्मिती केली आहे. याचबरोबर कंपनीने ईएस ४० हा नवा सिलिंग फॅन व स्विचगिअरमधील स्टॅन्डर्डची नवी नाममुद्राही यावेळी जारी केली.
नवी दिल्लीपासून ११९ किलो मीटरवर, गुरगावनंतर राजस्थानच्या सीमेवर असलेल्या हॅवल्स इंडियाच्या ४८ एकर जागेवरील नीमराना प्रकल्पातच कंपनी येत्या तिमाहीत वॉटर हिटर तसेच एअर कूलरचे उत्पादन विस्तारण्याच्या प्रयत्नात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
चीनी उत्पादनांचा फुगा फुटला!
देशातील औद्योगिक व निर्मितीपूरक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त करताना हॅवल्स इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल राय गुप्ता यांनी विद्युत उपकरणांबाबत भारतातून चीनी उत्पादनांची जादू आता ओसरल्याचा दावा केला. सुमार गुणवत्तेपोटी या उत्पादनांच्या वाढत्या खपाचा फुगा आता फुटला असून भारतीय ग्राहकांना दिर्घकाळ व ऊर्जेची बचत करणारी उत्पादने हवी आहेत, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ तसेच स्मार्ट सिटी धोरणामुळे भारतीय कंपन्यांना आगामी कालावधीत उज्ज्वल भवितव्य असून भविष्यात उपकरणांच्या निर्मितीचा खर्चही कमी होण्यासह येऊ घातलेल्या वस्तू व सेवा करामुळे एकूणच भारतीय उपकरण निर्मिती क्षेत्राला वाव असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader