मध्यवर्ती बँकेने दर कपात करूनही बँका मात्र त्याची अमलबजावणी न करण्याची रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांची तक्रार खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने मात्र काहीशी दूर केली आहे.
बँकेने तिचे विविध कर्ज कमी करण्याचा निर्णय सोमवारी अचानक घेतला. बँकेने तिचा आधार दरच थेट ०.३५ टक्क्य़ांनी केला आहे. यामुळे बँकेची कर्जे स्वस्त होणार असून बँकेचा ९.३५ टक्के हा आधार दर बँक क्षेत्रातील सर्वात कमी आहे.
एचडीएफसी बँकेने आधार दर ९.७० टक्क्य़ांपासून खाली आणत अन्य बँकांशी अनोखी स्पर्धा केली आहे. स्टेट बँकेने यापूर्वी रिझव्‍‌र्ह गव्हर्नरांच्या समक्षच पुन्हा एकदा व्याजदर स्वस्ताईत उडी घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
वार्षिक ९.७० टक्के हा आधार दर तूर्त या क्षेत्रातील अन्य स्पर्धक स्टेट बँक व आयसीआयसीआय बँक राखून आहेत. आधार दरापेक्षा कमी दरात वाणिज्यिक बँकांना कर्ज पुरवठा करता येत नाही.
रिझव्‍‌र्ह बँकेने २०१५ मध्ये आतापर्यंत तीन वेळा प्रत्येकी पाव टक्क्य़ाची दर कपात केली आहे. मात्र अन्य बँका दर कपात करत नाही, अशी गव्हर्नरांची बँकांबाबत तक्रार राहिली आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण सप्टेंबर अखेरिस सादर होणार आहे.

अ‍ॅक्सिसची ठेवीदरात कपात
देशातील तिसरी मोठी खासगी बँक अ‍ॅक्सिस बँकेने तिच्या ठेवीदरात अध्र्या टक्क्य़ापर्यंत व्याजदर कपात केली. बँकेने तिच्या विविध मुदत ठेवींवरील व्याजदर वार्षिक ०.२० ते ०.५० टक्क्य़ांपर्यंत कमी केले आहेत. तीन महिने ते एक वर्ष या कालावधीसाठी पाव ते अर्धा टक्का तर एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी ०.२० व दोन ते १० वर्षेसाठी ०.३० टक्के व्याजदर कमी करण्यात आले आहेत. नव्या दरांची अमलबजावणी तातडीने होणार आहे.

चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचा घसरता विकास दर हा उद्योगांचा, कंपन्यांचा भांडवली खर्च कमी व्हावा, हेच दर्शवितो. मागणी आणि गुंतवणूक या दोन्ही स्तरावर विश्वास निर्माण होण्याची नितांत गरज आहे. उद्योगांना माफक दरातील भांडवल उपलब्ध होऊन आर्थिक सुधारणा राबविल्या जाव्यात हिच अपेक्षा यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
– ज्योत्स्ना सुरी, अध्यक्षा, फिक्की.