विदेशातून भारताच्या भांडवली बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या अविरत ओघाचा सर्वाधिक लाभ गृहवित्त क्षेत्रातील अग्रणी एचडीएफसी लिमिटेडने मिळविलेला दिसतो. या कंपनीच्या भागभांडवलात विदेशी गुंतवणूकदारांच्या सहभागाचे प्रमाण सप्टेंबर २०१४ अखेर विक्रमी ७८ टक्क्य़ांवर गेले आहे. ‘सेन्सेक्स’ या प्रमुख निर्देशांकात सामील ३० कंपन्यांच्या समभागात प्रथमच ७५ टक्क्य़ांहून अधिक विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण म्हणूनही एचडीएफसीच्या समभागाने मान मिळविला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एचडीएफसीच्या भागभांडवलात विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण ७३.०९ टक्के होते, ते सप्टेंबर २०१४ अखेर ७७.८५ टक्क्य़ांवर गेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीतील विदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा निरंतर वाढत आला आहे.
एचडीएफसीच्या समभागाने सातत्याने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे, त्याचेच प्रत्यंतर म्हणून विदेशी गुंतवणूकदार संस्थांसाठी हा समभाग पसंतीचा ठरला असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे एचडीएफसीच्या संचालक मंडळाने विदेशी संस्थागत गुंतवणुकीची मर्यादा १०० टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याला अनुमती देणारा ठराव मे २०१२ मध्ये पारित केला आहे. सध्याच्या घडीला देशी आणि विदेशी संस्थांत्मक गुंतवणुकीचे या समभागातील एकूण प्रमाण ८८.१७ टक्क्य़ांवर गेले आहे.
एचडीएफसीच्या समभागाने जुलै ते सप्टेंबर हा तिमाही प्रवास भावात ६.२५ टक्क्य़ांच्या वाढीसह केला, तर याच काळात बीएसई सेन्सेक्सने ४.७८ टक्क्य़ांची वाढ दर्शविली आहे. या तीन महिन्यांच्या काळात विदेशी वित्तसंस्थांकडून २३,००० कोटी रुपये मूल्याची नक्त समभाग खरेदी स्थानिक बाजारातून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा