अग्रेसर खासगी आयुर्विमा कंपनी ‘एचडीएफसी लाइफ’ने दोन युनिटसंलग्न पेन्शन योजनांची सोमवारी घोषणा केली. विमा नियामक ‘आयआरडीए’कडून निर्देशित नव्या मार्गदर्शन प्रणालीनुसार प्रस्तुत झालेल्या या पहिल्याच निवृत्ती योजना आहेत.
एचडीएफसी लाइफने प्रस्तुत केलेल्या ‘एचडीएफसी लाइफ पेन्शन सुपर प्लस’ ही वार्षिक किमान ६ टक्के निश्चित परताव्याची हमी देणारी नियमित हप्ते भरावयाची युनिटसंलग्न योजना असून, त्यात विमेदाराचा मृत्यू झाल्यास तोवर भरलेल्या हप्त्यांची संपूर्ण भरपाई दिली जाणार आहे. तर ‘एचडीएफसी लाइफ सिंगल प्रीमियम पेन्शन सुपर’ ही दुसरी योजना ही व्हेस्टिंगसमयी भरलेल्या हप्त्यांच्या १०१ टक्के इतकी रक्कम मिळण्याची खात्री देणारी आहे.
उल्लेखनीय म्हणजे निवृत्तीसाठी बचत हे आर्थिक नियोजनातील महत्त्वाचे उद्दिष्ट सफल व्हावा या उद्देशाने कमावत्या काळात घेतलेल्या विम्यातून जमा होणाऱ्या रकमेतून त्याच विमा कंपनीकडून वर्षांसन (अॅन्युइटी) स्वरूपात निवृत्तीपश्चात नियमित लाभ देणारी ‘इमीडिएट अॅन्युइटी योजना’ही एचडीएफसी लाइफने प्रस्तुत केली आहे. ‘अॅन्युइटी’साठी लक्षणीय स्वरूपात पूंजी उभी राहील याची काळजी पेन्शन योजनांकडून घेतली जाईल आणि त्यातून विमेदाराला निवृत्तीपश्चात उत्तर आयुष्यात नियमित व स्थिर लाभाचीही काळजी त्याच कंपनीकडून घेतली जाईल, असा प्रयोग खासगी विमा कंपनीकडून पहिल्यांदाच होत असल्याचे याप्रसंगी बोलताना एचडीएफसी लाइफचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अमिताभ चौधरी यांनी सांगितले.

Story img Loader