देशातील मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या एचडीएफसी म्युच्युअल फंडाकडून गुंतवणूकदारांच्या तब्बल ३२९० कोटी पुंजीचे (३० सप्टेंबर २०१३ अखेर) व्यवस्थापन पाहणाऱ्या मॉर्गन स्टॅन्ले अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या आठ योजनांचे अधिग्रहण पूर्ण केल्याचे सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. या सौद्याची रक्कम मात्र एचडीएफसी म्युच्युअल फंडाने काढलेल्या पत्रकात देण्यात आलेली नाही.
या अधिग्रहणामुळे सप्टेंबरअखेर १.०१ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकदारांच्या निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एचडीएफसी म्युच्युअल फंडांचे अग्रस्थान आणखीच भक्कम बनणार आहे. भारतातील मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायात अनिल धीरूभाई अंबानीप्रणीत रिलायन्स म्युच्युअल फंड दुसऱ्या स्थानावर असून, ३० सप्टेंबर २०१३ अखेर ९४,२४९ कोटी रुपयांच्या गुंतवणूकयोग्य गंगाजळीचे व्यवस्थापन रिलायन्सकडून पाहिले जात आहे.
एकीकडे गेली पाच वर्षे उदासीन राहिलेल्या शेअर बाजारामुळे मिळणारा नकारात्मक परतावा पाहता बहुसंख्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडे पाठ फिरवीत आहेत. त्यातच ३० ते ४० हजारांपेक्षा गंगाजळी कमी असल्यास मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना जमा-खर्चाची तोंडमिळवणी करणे अशक्य बनले असून त्या तोटय़ात जात आहेत. नवीन योजना बाजारात आणूनही फार मोठा निधी गोळा होत नाही, हा ताजा अनुभव नुकत्याच बाजारात येऊन गेलेल्या आयसीआयसीआय व्हॅल्यू फंड सीरिज-१ योजनेखाली गोळा झालेल्या ६५० कोटी रुपयांनी दाखवून दिले. त्यामुळे या व्यवसायात टिकाव धरण्यासाठी गुंतवणूकयोग्य मालमत्ता वाढवायची झाल्यास, संपादन-अधिग्रहणाचाच मार्ग अनुसरावा लागेल, असे म्युच्युअल फंड व्यवसायातील माहितगाराने सांगितले. मॉर्गन स्टॅन्लेच्या अधिग्रहणासाठी तिच्या हाती असलेल्या एकूण मालमत्तेच्या ४.५ ते ५% रकमेइतका म्हणजे १६० ते १७० कोटींच्या घरात किंमत एचडीएफसी म्युच्युअल फंडाने मोजली असेल, असाही माहितगार सूत्रांचा कयास आहे.
भारतात ‘सेबी’कडे नोंदणीकृत ४४ म्युच्युअल फंडांपैकी जेमतेम १० माफक नफा कमावत असल्याची सध्याची स्थिती आहे. अनेक फंडांच्या योजना परस्परांशी साधम्र्य राखणाऱ्या आणि एकमेकांशी स्पर्धेत उतरल्या आहेत, तर दुसरीकडे गुंतवणूकदारांचा पाया विस्तारण्याऐवजी आक्रसत चालला आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड अव्वल स्थानी कायम असला तरी या व्यवसायातील पहिल्या पाच कंपन्यांपैकी मालमत्ता वाढीत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सर्वात खालच्या स्थानावर ढकलला गेला आहे.
विदेशी फंडांचा काढता पाय!
फिडेलिटी म्युच्युअल फंडानंतर मॉर्गन स्टॅन्ले हे भारतातील मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायातून बाहेर पडणारे दुसरे जागतिक फंड घराणे आहे. याआधी फिडेलिटीचे अधिग्रहण एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाने तर एसबीआय म्युच्युअल फंडाने दाइवा म्युच्युअल फंडावर १०० टक्के मालकी मिळविली आहे. त्याउलट इन्व्हेस्कोने रेलिगेअरमध्ये ४९% हिस्सा, तर नोमुराने एलआयसी म्युच्युअल फंडात ३५% वाटा विकत घेतल्याचीही ताजी उदाहरणे असली तरी विदेशी कंपन्या या व्यवसायातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर खासगी कंपन्यांना म्युच्युअल फंड सुरू करण्यास परवानगी मिळाली. यापैकी पहिल्या पिढीतील म्युच्युअल फंड म्हणून मॉर्गन स्टॅन्लेची ओळख आहे. मॉर्गन स्टॅन्लेने जानेवारी १९९४ साली ‘मॉर्गन स्टॅन्ले ग्रोथ फंड’ नावाने आणलेल्या पहिल्या योजनेला गुंतवणूकदारांनी बँकांच्या समोर रांगा लावून अर्ज केले होते. १५ वर्षे कालावधीच्या या मुदतबंद इक्विटी योजनेसाठी इच्छुकांच्या रांगा काही ठिकाणी तर दोन किलोमीटपर्यंत लांबल्याचे बोलले जाते. देशात दाखल झालेले हे पहिले फंड घराणे आता इतिहासजमा होत आहे.

Story img Loader