पुड्डूूचेरी येथील पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.कडून साकारल्या जात असलेल्या भारताच्या पहिल्या स्मार्ट ग्रिड उपक्रमाच्या विकासात ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज् (सीजी)’कडून योगदान दिले जाणार आहे. या प्रकल्पातील आधुनिक मीटिरग पायाभूत सुविधेतून ग्राहकांना सक्षम व विनाखंड वीजपुरवठय़ाचा लाभ मिळेल याची काळजी घेतली जाईल. अलीकडेच झेडआयव्ही ही कंपनी ताब्यात घेतल्याने स्मार्ट ग्रिड क्षेत्रातील मजबूत कंपनी म्हणून सीजीचे स्थान निर्माण झाले असून, आता स्मार्ट ग्रिड उपक्रमांसाठी लागणाऱ्या इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे (आयईडी) उत्पादन घेणारा तिचा अत्याधुनिक प्रकल्प बेंगुळूरूमध्ये सुरू होत आहे.
चार अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या अवंथा समूहाचा भाग असलेली सीजी कंपनी बेंगळुरू येथील जिगानी औद्योगिक परिसरात ग्रीनफिल्ड प्रकल्प विकसित करीत असून हा प्रकल्प या वर्षांअखेरीपर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. भारताचा स्मार्ट ग्रिड उपक्रम साकारण्यासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे. ऊर्जा यंत्रणेचे नियंत्रण व पाहणी करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘आयईडी’चे उत्पादन या प्रकल्पात केले जाणार आहे. या आयईडीचा वापर करून प्रकल्पात सबस्टेशन ऑटोमेशन स्टँडर्ड – आयईसी ६१८५० अनुसार नियंत्रण व रिले पॅनलची जुळणी केली जाणार आहे.
भारतातील विजेचे जाळे अतिशय गुंतागुंतीचे असल्याने आणि विजेची मागणी निरंतर वाढत असल्याने देशात स्मार्ट ग्रिड प्रणाली बसवण्याच्या प्रक्रियेला वेग येणे गरजेचे बनले आहे. स्मार्ट ग्रिड प्रणाली वीजपुरवठय़ामध्ये अखंडित नियंत्रण आणि कार्यक्षमता देत असल्याने उत्तर भारतात अलीकडेच जसा गोंधळ झाला तशा प्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण करता येईल. भारताला वीजनिर्मिती आणि पारेषण यामध्ये वाढ करावी लागणार आहे आणि या कल्पक ग्रिड कंट्रोल प्रणालीमधील गुंतवणुकीतून हे साध्य करता येईल. आतापर्यंत बेंगळुरूसहित अनेक शहरांत स्मार्ट ग्रिड टेक्नालॉजीजचे प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प राबवले जात आहेत. प्रकल्पासंबंधी बोलताना सीजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक लॉरेंट डिमॉर्टअिर यांनी सांगितले की, ४०५० चौरस मीटर क्षेत्रावरील या प्रकल्पात पहिल्या वर्षी ३० तंत्रज्ञांना नेमले जाईल. भारतीय बाजारातील मागणी लक्षणीय प्रमाणात वाढत असल्याने हा प्रकल्प अगोदर भारतीय बाजारपेठेत सेवा देणार आहे. नंतर नजीकच्या देशांतील मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा