हिंदुस्थान युनिलिव्हरचा सुमारे ३६० कोटी रुपयांचा (५ कोटी युरो) डिओडरन्ट निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातील विदर्भात साकारणार आहे. कंपनीचा आशियातील हा पहिला डिओडरन्ट उत्पादन निर्मिती प्रकल्प खामगाव (जि.बुलढाणा) येथे २०१५ पर्यंत अस्तित्वात येईल. यामार्फत थेट १५० तर अप्रत्यक्षरित्या २०० रोजगार निर्मिती होणार आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर (मे २०१०) दुसऱ्यांदा भारत दौरा करताना डेव्हिड कॅमरून यांनी सोमवारी थेट मुंबईत धडक दिली. यावेळी त्यांनी हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शहरातील कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीतच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नितिन परांजपे यांनी ही विस्तार योजना घोषित केली.
येत्या तीन वर्षांत जगभरात सर्वत्र करण्यात येणाऱ्या प्रकल्प विस्ताराचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील हा प्रकल्प युनिलिव्हर समूहामार्फत साकारण्यात येत आहे. समूहाद्वारे या कालावधीत ३० उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत. समूहाने यापूर्वीच थायलंड तसेच दक्षिण आफ्रिकेतील अनुक्रमे ७ कोटी व ७.५ कोटी युरोची गुंतवणूक जाहीर केली होती.
मूळच्या अँग्लो-डच समूहातील हिंदुस्थान युनिलिव्हर ही दैनंदिन उपयोगाच्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती कंपनीचे देशभरात १६,००० कर्मचारी असून ४० ठिकाणी उत्पादन निर्मिती प्रकल्प आहेत.