राष्ट्रीयीकृत ‘ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स’ने (ओबीसी) गृह कर्जावरील व्याजदरात अंशत: कपात केली आहे. बँकेच्या ३० लाख रुपयांपर्यंतचा कर्ज व्याजदर ०.१० टक्क्याने कमी करण्यात आला आहे.
बँकेचा सुधारीत १०.४० टक्के व्याजदरहा किमान आधारदराइतकाच (बेस रेट) असेल. विशेष म्हणजे अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढविले असताना या बँकेने गृह कर्जावरील व्याजदर नाममात्र का होईना कमी करीत कर्जदारांना नव्या वर्षांची भेट दिली आहे. बँकेने सर्व स्थिर प्रकारच्या मुदतपूर्व ठेवींवरील दंडशुल्कही माफ केला आहे. नव्या गृह कर्ज व्याजदरानुसार एक लाख रुपयांसाठी बँकेचा मासिक हप्ता ९३७ रुपये असेल. बँकेने २० लाख रुपयांवर देण्यात येणाऱ्या कर्जासाठी ‘मार्जिन’ २० टक्क्यांपर्यंत तर २० लाख रुपयांपेक्षा कर्जासाठी १५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आले आहे. याचाच अर्थ उपरोक्त रकमेच्या कर्जदारांना आता अनुक्रमे घराच्या खरेदी किमतीच्या ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल.
या अगोदर देना बँक आणि खासगी क्षेत्रातील फेडरल बँकेने मुदत ठेवींवरील व्याजाचे दर घटविले आहेत. तर खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने किमान आधार दर (बेस रेट) कमी करून तो ९.७० टक्के असा अग्रणी भारतीय स्टेट बँकेच्याही खाली आणला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home loan rate reduce by oriantal bank of commerce