विडी वळणाऱ्या महिलांचे स्वमालकीचे घर घेण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अॅस्पायर होम फायनान्स या गृहवित्त क्षेत्रातील कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या ‘माला’ योजनेंतर्गत ‘मुंबई विडी कामगार संघटने’च्या सदस्यांना सुलभ गृहकर्जाच्या उपलब्धतेचा हा उपक्रम राबविला जाणार आहे.
अॅस्पायर होम फायनान्सची माला ही केवळ महिलांना गृहकर्ज देणारी शाखा आहे. मुंबई विडी कामगार संघटनेशी कंपनीच्या झालेल्या करारानुसार, संघटनेच्या महिला सदस्यांना घरासाठी प्राधान्याने कर्ज दिले जाईल. विडय़ा वळून या महिलांना महिन्याकाठी मिळणारे निव्वळ उत्पन्न हे ५ ते ६ हजारांच्या घरात जाणारे असून, त्या कुटुंबात जोडीदाराच्या कमाईला हातभार लावत असतात. या बहुतांश महिला भाडय़ाच्या घरात अथवा झोपडवस्तीत राहणाऱ्या आहेत. अत्यल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या या महिलांना वाणिज्य अथवा सहकारी बँकांकडून घरासाठी कर्ज मिळणे दुरापास्त असताना, मालाची ही योजना त्यांच्यासाठी खूपच फायद्याची ठरेल आणि स्वमालकीच्या घराचे त्यांचे स्वप्न त्या पूर्ण करू शकतील, असा विश्वास माला विभागाच्या व्यवसायप्रमुख दीपाली शिंदे यांनी व्यक्त केला.
‘माला’च्या या योजनेतून गृहकर्ज उपलब्धतेबाबत, या महिलांना परवडतील अशा स्वस्त दरातील घरांच्या उपलब्धतेसाठी बिल्डरांशीही करार केले गेले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली. ‘माला’च्या योजनेसाठी ७५ विडी कामगार महिलांचे अर्ज दाखलही झाले असून, त्यापैकी २५ महिलांना सरासरी ३ लाख रुपयांची कर्जमंजुरीही आजवर मिळविली आहे, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader