रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर पतधोरणानंतर गेल्या आठवडय़ात किमान कर्जदर (बेस रेट) खाली आणणाऱ्या बँका-वित्तसंस्थांनी आता घरांसाठी कर्जावरील व्याजदर कपातीचा धडाका लावला आहे. या क्षेत्रातील अग्रेसर एचडीएफसी लिमिटेड, स्टेट बँकेने गृह कर्ज व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केल्यानंतर मंगळवारी आयसीआयसीआय बँकेसह आघाडीच्या तीन वित्तसंस्थांनी त्यांचे व्याज दर वार्षिक ९.९० टक्क्यांवर आणून ठेवले आहेत.
आयसीआयसीआय बँक व इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, डीएचएफएल, सुंदरम बीएनपी पारिबास होम फायनान्सने गृह कर्ज व्याज दरात मंगळवारी ०.२५ टक्क्यांपर्यंत दरकपात जाहीर केली. त्यांचे व्याजदर आता ९.९० टक्क्यांपर्यंत येऊन ठेपले आहेत.
नव्या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला रिझव्‍‌र्ह बँकेने स्थिर पतधोरण जाहीर केल्यानंतर आघाडीच्या काही बँकांनी ज्या दरापेक्षा अधिक दराने व्याज आकारता येणार नाहीत, असे किमान कर्जदर (बेस रेट) पाव टक्क्यापर्यंत कमी केले होते. त्याचाच परिणाम संबंधित वित्तसंस्थांचे गृहकर्जाचे व्याजदर कमी होण्यात झाल्याचे आता दिसून येत आहे.
इंडियाबुल्स व आयसीआयसीआय बँकेचा सध्याचा गृह कर्ज व्याजदर वार्षिक १०.१५ टक्के असा आहे. तो आता ९.९० टक्क्यांवर आला आहे. आयसीआयसीआय बँकेने विद्यमान आणि नव्याने गृह कर्ज घेणाऱ्यांना ताबडतोबीने (१४ एप्रिलपासूनच) सुधारीत व्याजाचे दर लागू केले आहेत.
वार्षिक ९.८५ टक्के हा महिला वर्गासाठी दर उपलब्ध करून देतानाच आयसीआयसीआय बँकेने त्यात दुर्बल घटकांनाही सामावून घेतले आहे. तर अन्य व्यक्तींसाठी गृह कर्ज व्याजदर ९.९० टक्के असेल. स्थिर स्वरूपाचा ९.९० टक्के दर हा १० वर्षे मुदतीच्या ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीही देऊ करण्यात आला आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
तर आयसीआयसीआय बँकेबरोबरच डीएचएफएलनेही दर सर्वाधिक ०.२५ टक्क्याने कमी करत तो उभय वित्तसंस्थांच्या बरोबरीने आणून ठेवला आहे. याचा लाभ शहरी व निमशहरी भागातील कर्जदारांना होईल, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांनी व्यक्त केला. सुंदरम बीएनपी पारिबासचा दर १०.१५ वरून ९.९५ टक्क्यांवर आला आहे. बाजाराशी सुसंगतच दरकपातीचा निर्णय लागू करत असल्याचे कंपनीचे संचालक श्रीनिवास आचार्य यांनी म्हटले आहे. आयसीआयसीआय बँकेचा किमान कर्जदर सध्या सर्वात कमी ९.७५ टक्के आहे. गेल्या शुक्रवारी एचडीएफसीने ०.२० टक्का कपात करत दर ९.९० टक्क्यांवर तर स्टेट बँकेने रविवारी ०.१० टक्के दर कमी करत गृह कर्ज व्याज दर ९.९० टक्क्यांवर आणून ठेवला होता.
दरम्यान, गृह कर्ज वितरण क्षेत्रात शिरकाव करताना मुथ्थूट समूहाने एक लाख ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी १०.२० टक्के व्याज दर देऊ केला आहे. ३० वर्षे कालावधीसाठीच्या कर्जासाठी मुथ्थूट होमफिनने १६ मेपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना प्रक्रिया शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे.

मंगळवारपासूनच अंमलबजावणी होणाऱ्या नव्या दरपद्धतीमुळे ५० लाख रुपयांपर्यंत ३० वर्षे मुदतीसाठी गृह कर्ज घेणाऱ्यांना प्रति लाख ८७० रुपये मासिक हप्ता पडेल, असे इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गगन बंगा यांनी म्हटले आहे.

Story img Loader