गृहनिर्माण क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये स्थिरावलेल्या घरांच्या किंमती आगामी वर्षांच्या सुरुवातीपर्यंत तशाच कायम राहतील, अशी घर खरेदीस इच्छुकांचा उत्साह वाढविणारी पाहणी ‘नाईट फ्रँक’ या सल्लागार संस्थेने प्रसिद्ध केली आहे.
मालमत्ता बाजारपेठेत सल्लागाराची भूमिका बजावणाऱ्या या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात विकासकांकडून घर खरेदीवरील सूट-सवलतींची भूमिका यापुढेही मर्यादित कालावधीसाठी कायम राहील, असा निष्कर्ष काढला आहे.
२०१४ च्या मध्यापर्यंत शहरातील जागांचे भाव फार वाढणार नाहीत; मात्र नवी मुंबई, ठाणे तसेच मध्य तसेच पश्चिम उपनगरातील घरांच्या किंमतींमध्ये स्थिरता येऊ शकते अथवा काही अंशी दर वाढू शकतात, असे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी म्हटले आहे.
याबाबत कंपनीचे संचालक (संशोधक) डॉ. सामंतक दास यांनी सांगितले की, सध्याचे गृहनिर्मिती क्षेत्र हे खरेदीदारासाठी सकारात्मक वातावरण तयार करणारे आहे. हे हेरून बांधकाम कंपन्या, विकासकांचे धोरणदेखील आगामी कालावधीत ग्राहक-केंद्रीत राहणार असून यापोटी ते घरांच्या किंमती मोठय़ा प्रमाणात वाढविणार नाहीत.
कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात २०१३ मधील जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान मुंबईसारख्या शहरात २.९ लाख घरे बांधकामाच्या स्थितीत असून अद्यापही १ लाख ३० हजार घरे विकली गेलेली नाहीत. शहरात नवीन गृहनिर्मिती २०१० च्या तुलनेत यंदा ४० टक्क्यांनी रोडावली आहे, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. तर विकल्या न गेलेल्या घरांचे प्रमाण हे ४४ टक्के आहे. जानेवारी ते सप्टेंबर या २०१३ सालच्या नऊ महिन्याच्या कालावधीत ४७,४८८ निवासी घरे उभी राहिली. घरांच्या किंमती फार न वाढण्याचा कालावधी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत राहू शकतो, असेही तिने म्हटले आहे.

‘सहा महिन्यात घरांच्या किंमती ओसरतील’
येत्या सहा महिन्यात घरांच्या किंमती आणखी खाली येतील, असे मत बंगळुरुच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेने सर्वेक्षणाअंती व्यक्त केले आहे. ‘मॅजिकब्रिक्स’ या मालमत्ताविषयक संकेतस्थळाच्या सहकार्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी गृह निर्देशांकाद्वारे देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये येणाऱ्या सहा महिन्यात घरांच्या किंमती कमी होतील, असे आढळून आले आहे. गेल्या तिमाहीत निर्देशांकात नोंदविलेल्या ११७ गुणांच्या तुलनेत यंदाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घरांच्या किंमती कमी होणार हे मत नोंदविण्यासाठी यंदा ९३ गुण नोंदविले गेले. म्हणजेच गृह निर्देशांक जवळपास २० टक्क्यांनी खालावला आहे. याचाच अर्थ घरांच्या किमती कमी होतील, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घरांच्या किंमती १० टक्क्यांने कमी होतील, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण यंदा दुप्पट, २५ टक्के झाले आहे. किंमती कमी आल्यास घर खरेदीसाठी थांबण्याची ग्राहकांची तयारी ही तब्बल ९ महिन्यांपर्यंत आहे, असेही सर्वेक्षणात सहभागींनी मत नोंदविले आहे.

Story img Loader