पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या लोकप्रियतेची भारतीय वाहनधारकांमधील भुरळ जपानच्या होंडाला पडली आहे. यापूर्वी केवळ पेट्रोलवर चालणारी प्रवासी वाहने तयार करणाऱ्या होंडाचे देशातील पहिले डिझेल वाहन येत्या आठवडय़ात भारतात दाखल होत आहे.
मुळच्या जपानच्या होंडामार्फत भारतात आतापर्यंत प्रिमिअम सेदान (सिटी, सिव्हिक) तसेच हॅचबॅक (ब्राओ, जॅझ) आदी प्रवासी वाहने केवळ पेट्रोल इंजिनावर तयार केली जात आहेत. कंपनीने आता देशातील चालकांची डिझेलवरील वाहनांची वाढती पसंती लक्षात घेऊन याही क्षेत्रात पदार्पण करावयाचे ठरविले आहे.
१.५ लिटर आय-डीटीईसी डिझेल इंजिन (१,५०० सीसी) बसविण्यात येणारी पहिली प्रवासी कार ‘अमेझ’ या नावाने येत्या आठवडय़ात सादर करण्यात येणार आहे. तिची किंमत ६.५ लाख रुपये राहण्याची शक्यता आहे. कंपनीने येत्या तीन वर्षांत नवीन ५ वाहने भारतीय बाजारपेठेत सादर करण्याचे निश्चित केले आहे. त्याचबरोर प्रवासी वाहन क्षेत्रातील कंपनीचा सध्याचा १० टक्के बाजारहिस्सा डिझेल वाहन निर्मितीनंतर ५० टक्क्यांवर नेण्याचा कंपनीचा मनोदय आहे.
सेदान श्रेणीतील मात्र ४ मीटरपेक्षा कमी लांबीचे पहिले डिझेल वाहन भारतात सर्वप्रथम टाटा मोटर्सने इंडिगोच्या माध्यमातून आणले होते. यानंतर तिला कट्टर स्पर्धा निर्माण करत मारुती सुझुकीच्या स्विफ्ट डिझायरने आगेकूच केली. आता ‘अमेझ’द्वारा पुन्हा एकदा डिझेल आणि सेदान श्रेणीतील वाहनांची स्पर्धा तीव्र होणार आहे.
केवळ डिझेल इंजिन निर्मितीच्या कारसाठी कंपनीने राजस्थानमधील तापूकाराची निवड केली असून या प्रकल्पासाठी २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. तूर्त येथे २६५ कर्मचाऱ्यांद्वारे वर्षांला १.२० लाख इंजिनाचे उत्पादन होईल. २०१४ पर्यंत पूर्ण क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर २,२०० रोजगार निर्मिती वार्षिक २.४० लाख इंजिन निर्मिती क्षमता होईल.
होंडाची पहिली डिझेल ‘अमेझ’
इंजिन : १.५ लिटर आय-डीटीईसी
क्षमता : २५.८ किलोमीटर प्रती लिटर
किंमत : ६.५ लाख रुपये