आरामदायी आणि बहुपयोगी वाहनाला प्राधान्य देण्याचा कल भारतीयांमध्ये वाढू लागला आहे. ग्राहकांची हीच गरज ओळखून होंडा कार्स इंडिया लिमिटेडतर्फे मोबिलिओ ही मल्टिपर्पज व्हेइकल (एमपीव्ही) गटातील कार बाजारात आणली जाणार आहे. पुढील महिन्यात मोबिलिओ ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
गेल्या आíथक वर्षांपासून अनेक कारनिर्मात्या कंपन्यांचा आलेख घसरणीला लागलेला असतानाच होंडा कार्सने मात्र देशांतर्गत बाजारपेठेत आघाडी घेतली आहे. अमेझ आणि नव्या स्वरूपातील सिटी या दोन्ही गाडय़ांना ग्राहकांची पसंतीची पावती मिळाल्यानंतर आता होंडाने मल्टिपर्पज व्हेइकल गटाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
या पाश्र्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये मोबिलिओ सादर करण्यात आली होती. मोबिलिओ आता ग्राहकांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली असून जुलमध्ये तिचे रीतसर सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या मार्केटिंग आणि विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सेन यांनी येथे दिली.
पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हर्जनमध्ये मोबिलिओ उपलब्ध असेल. मात्र तिच्या किमतीविषयी अधिक बोलण्यास सेन यांनी नकार दिला. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हींशी मोबिलिओची स्पर्धा असेल, असे सांगतानाच बहुपयोगी प्रकारातील मोबिलिओ ग्राहकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल, असा विश्वासही सेन यांनी या वेळी व्यक्त केला.
प्रतिकूल परिस्थितीतही होंडाने चांगली कामगिरी नोंदवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. येथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या नव्या कारखान्याची माहितीही त्यांनी दिली. तापुकारा येथील कारखान्यातून सद्य:स्थितीत केवळ अमेझचेच उप्तादन केले जात असून मोबिलिओची निर्मिती मात्र कंपनीच्या नोएडा येथील कारखान्यातून केली जाणार आहे.
 चालकांची पसंती ठरणारी मल्टिपर्पज व्हेइकल श्रेणी गेल्या काही महिन्यांपासून वेगाने वाढत आहे. मारुती सुझुकीच्या इर्टिगाने यात पाऊल ठेवल्यानंतर शेव्हर्लेची एन्जॉय, निस्सानची इव्हेलिया यांनी ही स्पर्धा अधिक तीव्र केली. एकीकडे हॅचबॅक आणि एसयूव्हीचा आनंद देणारी कॉम्पॅक वाहन प्रकारातील घडामोडी तीव्र होत असताना कंपन्या एमपीव्हीवरही त्याच प्रमाणात नजर ठेवून आहेत.
मिनी एसयूव्ही म्हणून ओळखले जाणाऱ्या कॉम्पॅक्टमध्ये सध्या रेनोची डस्टर व फोर्डच्या इकोस्पोर्टची कट्टर स्पर्धा सुरू आहे. तुलनेत महिंद्रची क्व्ॉन्टो मागे पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा