देशाच्या दुचाकींच्या बाजारपेठेत वेगाने मुसंडी मारणाऱ्या जपानी वाहन उद्योगातील अग्रणी ‘होंडा’ने भारतात विकल्या गेलेल्या ११,५०० ‘सीबीआर २५० आर’ बाइक्स ब्रेक्स सदोष असल्याच्या तक्रारींनंतर परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्राहकांना विकल्या गेलेल्या वाहने सदोषतेपायी परत मागविण्याचा दुचाकींच्या बाबतीतील होंडा अथवा कोणाही उत्पादकावर आलेला हा पहिलाच प्रसंग आहे. परंतु चारचाकी वाहनांबाबत असे प्रयोग अनेकवार राबवून होंडाने जगभरात एक चांगलाच पायंडा निर्माण केला आहे. गेल्या वर्षीच भारतात ‘होंडा सिटी’ कारच्या पॉवर विंडो स्विचेसमधील सदोषतेपायी विक्री झालेल्या ७२,११५ कार कंपनीने परत मागविल्या होत्या.
मार्च २०११ ते सप्टेंबर २०१२ या दरम्यान निर्मिती झालेल्या ‘सीबीआर २५० आर’ बाइक्सच्या ब्रेक्स प्रणालीत दोष असल्याचे होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया लि. या कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या देशभरातील अधिकृत विक्रेत्यांकडून ‘सीबीआर २५० आर’ची मालकी मिळविणाऱ्या ग्राहकांना कंपनीच्या या घोषणेसंबंधी सूचित करण्यात आले आहे. तब्बल दीड लाख रुपयांच्या घरात किंमत असलेल्या या बाइकमधील यांत्रिक दोषाची ‘वॉरन्टी’ काल सुरू असेल वा नसेल तरी विनामूल्य दुरूस्ती केली जाईल, असेही कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा