भारतीय रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण पूर्वसंध्येला भांडवली बाजाराने उत्तम कामगिरी बजाविली. नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सेन्सेक्स तब्बल २४२.३२ अंशाने वधारत २५,५०० च्या वर जात २५,७२३.१६ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील ८१.०५ अंश वधारणेसह ७,६८३.६५ वर बंद झाला. व्यवहारात तो ७,६९४.८० ते ७,६२२.०५ असा प्रवास करता झाला.
मुंबई शेअर बाजाराने याचबरोबर गेल्या दोन व्यवहारांतील घसरण रोखली. या दरम्यान मुंबई निर्देशांकात ६०६.५८ अंश घट झाली होती. तर निफ्टीनेही याच कालावधीत १८९ अंशांचे नुकसान सोसले होते.
व्याजदराशी निगडित बँक, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन क्षेत्रातील समभागांच्या खरेदी जोरावर सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स सत्रात २५,७५४.४२ पर्यंत झेपावला. मुंबई निर्देशांकाला या वेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनीही साथ दिली.
जागतिक शेअर बाजारही सोमवारी सावरलेले दिसले. चीनमधील वधारती आर्थिक आकडेवारी आणि पोर्तुगालची सावरणारी मध्यवर्ती बँक या घडामोडी लक्षात घेत आंतरराष्ट्रीय निर्देशांकांनीही तेजी नोंदविली.
सोमवारच्या व्यवहारात २५,५३१.३८ पर्यंत दिवसाची नीचांक राखणारा सेन्सेक्स दिवसअखेर मात्र पुन्हा स्थिरावला. रिझव्र्ह बँक मंगळवारच्या पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी कमी दरांवर खरेदीचा कल नोंदविला.
विशेषत: व्याजदराचा परिणाम करणाऱ्या स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक यांच्या समभागात एक टक्क्य़ाची वाढ झाली. तर मारुती सुझुकी, बजाज ऑटोचे समभाग मूल्यही २.४ टक्क्य़ांपर्यंत उंचावले.
सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २५ कंपनी समभाग वधारणेच्या यादीत राहिले. त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस, विप्रोसह हिंदाल्को, सेसा स्टरलाइट, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एल अॅण्ड टी, आयटीसी, टाटा पॉवर, महिंद्र अॅण्ड महिंद्र यांचाही क्रम राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक सर्वाधिक ३.२ टक्क्य़ांनी वधारला. पाठोपाठ माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, बँक क्षेत्राची कामगिरी राहिली. मुंबई शेअर बाजाराची सोमवारची वाढ ही गेल्या पंधरवडय़ातील सवरेत्कृष्ट वाढ राहिली आहे. यापूर्वी २२ जुलै रोजी सेन्सेक्स एकाच सत्रात तब्बल ३१०.६३ अंशांनी उंचावला होता. निफ्टीनेही हीच कामगिरी याच दिवशीच्या ८३.६५ अंश वाढीनंतर सोमवारी राखली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा