भारत सरकारने पीएफ खात्यांची केवायसी करणे अनिवार्य केले आहे. या अंतर्गत ईपीएफ धारकांना आपल्या अकाउंटला आधारसह अन्य काही दस्तऐवज लिंक करणे अतिशय आवश्यक आहे. मात्र यासाठी चिंता करण्याची गरज नाही. ईपीएफओने आपल्या सर्व खातेधारकांसाठी काही खास फीचर्स सादर केले आहेत. या फीचर्सच्या मदतीने तुम्ही कधीही आणि कुठूनही आपल्या ईपीएफ खात्याचे केवायसी अपडेट करू शकता.
ईपीएफ खात्याचे केवायसी अपडेट करण्याचे फायदे :
ईपीएफ खात्याचे केवायसी अपडेट करणे अनिवार्य असले, तरी त्याचे फायदेही अनेक आहेत. जर तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्याचे केवायसी अपडेट केले नसेल तर तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये तुम्हाला ईपीएफ खात्याशी संबंधित ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येणार नाही. केवायसी अपडेट केल्याशिवाय तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही किंवा ई-नामांकन फाइल करू शकत नाही. याशिवाय तुम्ही तुमचे पीएफ खाते ट्रान्सफरही करू शकत नाही.
पीएफ खात्याचे केवायसी कसे अपडेट करावे?
- सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ला भेट द्या.
- आता तुमचा १२ अंकी युएएन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
- लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्याच्या शीर्षस्थानी एक हिरव्या बारमध्ये तुम्हाला ‘मॅनेज’ लिहिलेले दिसेल.
- ‘मॅनेज’वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील. यामध्ये केवायसीचा एक पर्यायदेखील असेल. यावर क्लिक करा.
- केवायसीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. आता समोरील चेक बॉक्सवर क्लिक करून तुमच्याकडे असलेल्या सर्व कागदपत्रांचे तपशील भरा. यामध्ये आधार, बँक आणि पॅन कार्डचे तपशील भरणे अनिवार्य आहे.
- सर्व तपशील भरल्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा.
- सेव्ह केल्यानंतर, तुमचे सर्व तपशील तुमच्या नियोक्त्याकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. त्यानंतर तुमचा नियोक्ता त्यास मान्यता देईल आणि तुमचे केवायसी तपशील यशस्वीरित्या अपडेट केले जातील.