देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत एचएसबीसी या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने भारतीय कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीबाबत साशंकता व्यक्त केली आहे. कंपन्यांच्या गेल्या आर्थिक वर्षांतील वित्तीय निष्कर्षांचा हंगाम सध्या सुरू आहे. सुरुवातीचे काही कंपन्यांचे निकाल अपेक्षेनुरुप नसल्यामुळे भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी निराशा व्यक्त केली आहे. आता एचएसबीसीने त्यात देशातील मान्सून यंदा समाधानकारक न राहण्याची भीतीही व्यक्त केली आहे.
अस्वस्थ बाजारातही व्याजदराचीच चिंता
अत्यंत अस्वस्थ व्यवहार नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात बुधवारी अखेर मोठी तेजी नोंदविली गेली. घसरत्या औद्योगिक उत्पादन दराबरोबरच कमी होत असलेल्या महागाई दरामुळे रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वर्तविणाऱ्या गुंतवणूकदारांनी प्रमुख निर्देशांकांला वरच्या टप्प्यावर नेऊन ठेवले.
असे करताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ३७३.६२ अंश उसळी घेत २७ हजार पल्याड, २७२५१.१० पर्यंत पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही शतकी अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८,२०० वर स्थिरावला आहे. दोन्ही निर्देशांक १.२५ टक्क्य़ांवर उसळले आहेत.
एप्रिलमधील महागाई दर ५ टक्क्य़ांच्या आत विसावला असतानाच मार्चमधील चार महिन्यातील औद्योगिक उत्पादन दराने तळ राखला आहे.
गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर हा चार महिन्याच्या किमान पातळीवर विसावला आहे. तर मार्चमधील पाच महिन्याच्या तळात विसावलेल्या औद्योगिक उत्पादन दराने चिंता वाढविली आहे.
यामुळे रिझव्र्ह बँकेकडून येत्या पतधोरणात व्याजदर कपातीची आशा बाजारात व्यक्त केली गेली.
परिणामी व्याजदराशी निगडित बँक, वाहन समभागांमध्ये खरेदी नोंदली गेली. सेन्सेक्समधील अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक हे बँक समभाग ४.९५ टक्क्य़ांपर्यंत आघाडीवर राहिले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही बँक निर्देशांक २.६४ टक्के वाढीसह वरचढ ठरला. सेन्सेक्समधील २२ समभाग तेजीत राहिले.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे १.५९ व ०.९२ टक्क्य़ांनी वधारले. सत्रात २६,७५०.०१ पर्यंत घसरल्यानंतर २७ हजारापुढील वाटचाल नोंदविणारा मुंबई निर्देशांक व्यवहारात २७,२९९.८० पर्यंत झेपावला होता. बुधवारचा निफ्टी प्रवास ८,२५४.९५ ते अगदी ८,०८९.८० दरम्यान राहिला.
एमएससीआय निर्देशांकात आठ कंपन्यांचा समावेश
विदेशी गुंतवणूकदारांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाणाऱ्या एमएससीआय निर्देशांकात बुधवारी आठ कंपन्यांचे समभाग समाविष्ट करण्यात आले. यामध्ये भारती इन्फ्राटेल, आयशर मोटर्स, ल्युपिन, भारत फोर्ज, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मॅरिको, श्री सिमेंट, यूपीएल यांचा समावेश राहिला. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला या यादीतून वगळण्यात आले. असे असूनही कंपनी समभाग बुधवारी व्यवहारात ३ टक्क्य़ांनी उंचावला. हा बदल २९ मेपासून अस्तित्वात येणार आहे. या निर्देशांकात सध्या ६४ कंपनी समभागांचा समावेश आहे. यामध्ये इन्फोसिस, एचडीएफसी, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रिज, सन फार्मा, आयटीसी यांचा क्रम आहे.
मूडीजकडून विकास दर अंदाज ७.५ टक्केच
आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मूडीजने भारताचा यंदाचा आर्थिक विकास दर ७.५ टक्केच अभिप्रेत केला आहे. येत्या दीड ते दोन वर्षांमध्ये व्यवसायपूरक वातावरणात आर्थिक सुधारणांमुळे भर पडेल, असे नमूद करतानाच जागतिक आर्थिक अस्वस्थता व देशांतर्गत कमी मान्सून यांचे सावट विकास दरावर असेल, असे म्हटले आहे. मध्यम कालावधीसाठी देशाच्या आर्थिक सुधारणा त्वरित राबविणे कठीण असल्याचे मत व्यक्त करत मूडीजने जारी केलेल्या आपल्या अहवालात येणारी दोन तिमाही चिंताजनक राहिल, असे नमूद केले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हमार्फत होणारी संभाव्य व्याजदर वाढ भारतासारख्या आर्थिक स्थितीवरही परिणाम करेल, असेही म्हटले गेले आहे. भारतासाठी ‘बीएएए३’ असे सकारात्मक मानांकन देणाऱ्या मूडीजने येत्या दोन वर्षांसाठी ७.५ टक्के विकास दर अंदाजित केला आहे.
रुपया १७ पैशांनी भक्कम
मुंबई : भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा बुधवारी झालेला पुर्नप्रवेश स्थानिक चलनाला भक्कमता प्रदान करता झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया आठवडय़ातील तिसऱ्या सत्रात १७ पैशांनी उंचावत ६४ वर स्थिरावला. गेल्या काही सत्रांमध्ये स्थानिक चलनाने ६४ ची पातळी सोडत चिंता वाढविली होती. मंगळवारीही रुपया तब्बल ३२ पैशांनी आपटला होता. चलनाचा बुधवारचा प्रवास ६४.२१ पर्यंत घसरल्यानंतर आधीच्या व्यवहाराचय तुलनेत तो ०.२६ टक्क्य़ांनी उंचावला.