युरोपातील सर्वात मोठय़ा बँकेने चीन, भारतासह आशियावर लक्ष केंद्रित करण्यासह समूहातील तब्बल ५० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे पाऊल उचलले आहे. लंडनस्थित एचएसबीसीने तुर्की व ब्राझीलमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ सालापर्यंत ५ अब्ज डॉलरचा वार्षिक खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने ही वाटचाल मानली जात आहे.
एचएसबीसीने खर्च कपात करण्यासाठी तीन वर्षांसाठीची योजना आखली आहे. यानुसार ४.५ ते ५ अब्ज डॉलर खर्च कमी करण्याची योजना आहे. नव्या टप्प्यात बँकेने समूहात जागतिक स्तरावर २५ ते ५० हजापर्यंत कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बँकेच्या तुर्की आणि ब्राझील येथील व्यवसाय गुंडाळण्यातही येणार आहे. येत्या दोन वर्षांत समभाग मिळकत १० टक्क्यांनी वाढविण्याचा बँकेचा मनोदय आहे.
गेल्या अनेक तिमाहींपासून नफ्यात राहिलेल्या मात्र काही आर्थिक गैरव्यवहारांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालेल्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट गुललिव्हर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. २०११ पासून या पदावर राहिलेल्या स्टुअर्ट यांच्या कालावधीत आतापर्यंत ८७,००० कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. तर जगभरातील विविध ७८ व्यवसायही बंद करण्यात आले आहेत. त्याबरोबर बँकेच्या कार्यरत देशांची संख्याही ७३ वरून थेट १५ वर येणार आहे.
बँकेने गेल्याच महिन्यात युरोपातील ३० हजार कर्मचारी कपात करत २.५ अब्ज डॉलर वाचविण्याचा दावा केला होता. तर यापूर्वीच्या २० हजार कर्मचारी कपात फेऱ्यात बँकेचा डिजिटल, ऑटोमेशन व्यवसाय बंद करण्यात आला. नव्या निर्णयातील कर्मचारी संख्या प्रमाण हे एकूण कर्मचाऱ्यांच्या १० टक्के आहे. कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अधिकतर कायमस्वरूपी दर्जाचे कर्मचारी आहेत.
एचएसबीसीमधील कर्मचारी कपातीच्या निर्णयानंतर लंडनच्या भांडवली बाजारात सकाळच्या वेळी बँकेचा समभाग १.१ टक्क्यांनी घसरला. वर्षभरात समभाग मूल्य अवघ्या ०.७ टक्क्यांनी उंचावले आहे.
चीनच्या पर्ल नदीकाठी १५० वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या या बँकेला परिसरातीलच हाँगकाँगवरून एचएसबीसी (हाँगकाँग अ‍ॅण्ड शांघाय बँक ऑफ कॉर्पोरेशन) असे नाव देण्यात आले. लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या या बँकेची स्थापना चीन आणि युरोपमधील व्यापार वृद्धीच्या उद्देशाने हाँगकाँगमधील पूर्वाश्रमीच्या ब्रिटिश वसाहतीत करण्यात आली. सध्या ७० देशांमध्ये व्यवसाय असलेल्या बँकेचे ५.१ कोटी ग्राहक आहेत.
कर्मचारी कपातीच्या दृष्टीने एचएसबीसीने उचललेले पाऊल हे योग्य दिशेनेच पडले आहे, असे मला वाटते. बँकेत असे काही होणार याची कल्पना होतीच. मात्र घेण्यात येत असलेले निर्णय प्राप्त परिस्थितीत मुळीच चुकीचे नाहीत.
क्रिस व्हाईट, प्रीमियर फंड मॅनेजर्स लि.
(क्रिस यांनी बँकेचे समभाग खरेदी करत ३.९ अब्ज पौंडाचे अर्थसाहाय्य केले आहे.)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपातीतून काटकसर
* २०१० अखेर बँकेचे जागतिक स्तरावर एकूण २,९५,००० कर्मचारी होते
* मध्यंतरी झालेल्या कपातीनंतर ही संख्या २,५८,००० पर्यंत खाली आली.
* आताच्या कपातीनंतर २,०८,००० कर्मचारी शिल्लक राहतील.
* २०१७ पर्यंत कर्मचारी कपात पूर्ण करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsbc to cut 25000 jobs slash billions from costs