गेले १० महिने हे वाहन उद्योगासाठी विक्रीच्या दृष्टीने अत्यंत खडतर गेले असतील, परंतु ह्य़ुंदाई मोटर इंडिया लि.ने याच काळात आपला बाजारहिस्सा वाढवत नेत विक्रमी २०.४ टक्क्यांवर नेला. देशाच्या ग्रामीण बाजारपेठेवर भिस्त ठेवत पद्धतशीर आखलेल्या विस्तार धोरणाची ही परिणती असून, दशकातील सर्वोत्तम मानला गेलेला यंदा मान्सून म्हणजे भारताच्या या दुसऱ्या क्रमांकाच्या कारनिर्मात्या कंपनीसाठी पर्वणीच ठरेल. ह्य़ुंदाईने मुंबईत बुधवारी ‘ग्रॅण्ड आय १०’ या नव्या छोटेखानी श्रेणीतील कारची प्रस्तुती केली. ‘आय १०’ या ह्य़ुंदाईच्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या कारबाबत कृतज्ञता म्हणून केवळ नव्या ‘ग्रॅण्ड’ नामाभिधानाशी ते संलग्न करण्यात आले आहे; तथापि ही नवीन कार ‘आय १०’च्या तुलनेत अनेक नावीन्यपूर्ण वैशिष्टय़ासह संपूर्णपणे वेगळ्या बनावटीचे असल्याचे ह्य़ुंदाईचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विपणन व विक्री) राकेश श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. मारुतीच्या सध्या सर्वाधिक खपाच्या ‘स्विफ्ट’शी थेट स्पर्धेत उतरलेल्या ह्य़ुंदाईच्या नवीन ‘ग्रॅण्ड आय १०’ पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारांत उपलब्ध झाली असून, अनुक्रमे रु. ४.२९ लाख आणि रु. ५.२५ लाखांपासून तिची किंमत (मुंबईत एक्स-शोरूम) सुरू होते.
कंपनीने गेल्या काही वर्षांत पद्धतशीरपणे ग्रामीण भागातील विपणन जाळे विस्तारत आणले आहे. सध्या २७० च्या घरांत असलेल्या ग्रामीण डीलर्सची संख्या ही वर्षअखेर ३५० पर्यंत विस्तारेल, असे नियोजन श्रीवास्तव यांनी सांगितले. याचा परिणाम म्हणून २०११ सालात ह्य़ुंदाईच्या भारतातील एकूण विक्रीत १५ टक्के असलेला ग्रामीण भागाचा हिस्सा हा चालू वर्षअखेर १८ टक्क्यांची पातळी गाठेल. यंदाची मान्सूनची कृपादृष्टी ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरेल आणि कंपनीच्या विक्रीतील वाढीच्या नियोजनाला हा अतिरिक्त हातभार ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader