रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याज दरकपातीची जेटली यांची आशा

रिझव्‍‌र्ह बँकेने आगामी पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर खाली आणावेत अशी आपली इच्छा असल्याचे स्पष्ट करीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘प्रत्येकाची हीच इच्छा’ असल्याचे सांगितले.

वित्तीय सुदृढतेसाठी पुरेपूर प्रयत्न करून सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत वित्तीय तुटीबाबत निर्धारीत ३.९ टक्के उद्दिष्टाचे पालन करण्यात सरकारला यश आले. तर आगामी आर्थिक वर्षांत हे उद्दिष्ट आणखी खाली आणून ३.५ टक्के राखण्यात आले आहे. शिवाय सरकारने अल्पबचत योजनांवर देय व्याज दरात कपात करून बँकांना कर्जे स्वस्त करण्यास मुभा दिली आहे, असे जेटली यांनी नमूद करू रिझव्‍‌र्ह बँकेच्या दृष्टीने सकारात्मक स्थिती निर्माण केली गेली असल्याकडे निर्देश केला.

चलनवाढीचा दर हा ५ टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे. या स्थितीत कर्जावरील व्याजाचे दर चढे राहिल्यास ते अर्थव्यवस्थेत साचलेपण आणणारे ठरेल, असे जेटली यांनी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला निघताना वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

आगामी आर्थिक वर्षांतील रिझव्‍‌र्ह बँकेची पहिली द्विमासिक पतधोरण आढाव्याची बैठक येत्या ५ एप्रिलला होत आहे. भारतीय उद्योगक्षेत्राने या बैठकीत जवळपास अर्धा टक्का रेपो दरकपात केली जाऊन उद्योगक्षेत्राच्या वाढीला चालना दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

१२ मार्च रोजी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या वित्तीय सुदृढतेच्या आघाडीवरील कामगिरी समाधानकारक असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तथापि या संदर्भात पतधोरणातून कोणता प्रतिसाद दिला जाईल यावर मात्रा ‘थांबा आणि प्रतीक्षा करा’ असे सूचित करून राजन यांनी अप्रत्यक्षपणे सकारात्मक संकेतही दिले आहेत.पाव टक्का कपात शक्य -डीबीएस

नवी दिल्ली : रिझव्‍‌र्ह बँकेकडून सावधपणे परंतु धोरण नरमाई दिसू शकेल व आगामी आठवडय़ातील नियोजित पतधोरणात माफक स्वरूपात व्याज दरकपात होईल, असा विश्वास डीबीएसच्या संशोधन टिपणात मंगळवारी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीतील ताजी वाढ आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी पाहता रिझव्‍‌र्ह बँकेला आक्रमकपणे अर्धा टक्क्यांची दरकपातीला खूप अत्यल्प वाव आहे. शिवाय अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हनेही एप्रिल-जून तिमाहीपासून पुन्हा व्याज दरवाढीचा मार्ग स्वीकारण्याची शक्यताही रिझव्‍‌र्ह बँकेला लक्षात घ्यावी लागेल, असे डीबीएसने या टिपणांत म्हटले आहे.

Story img Loader