बँकांचा सध्याचा सर्व कारभार व त्यांच्या ग्राहकांसाठी असलेल्या योजना व सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे मोठे योगदान आहे. सध्या वापरात असलेल्या व आगामी काळात येऊ घातलेल्या बँकिंग तंत्रज्ञानावर आधारीत ‘आयबेक्स इंडिया २०१३’ परिषद व प्रदर्शनाचे आयोजन यंदा १७ जानेवारी ते १९ जानेवारी या दरम्यान मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे.
‘नाविन्यपूर्ण बँकिंगसाठी तंत्रज्ञानात्मक सुसज्जता’ या विषयावरील बीजभाषणासह पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. सी. रंगराजन यांच्या हस्ते या परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. परिषदेच्या अन्य सत्रांमध्ये केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. सौमित्र चौधरी, रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. के. सी. चक्रवर्ती आणि आनंद सिन्हा, आयडीआरबीटी संचालक सांम्बामूर्ती, एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्याधिकारी ए. पी. होता, एनआयबीएमचे संचालक अॅलन सी परेरा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. टांकसाळे, आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. एम. मल्ला, युनियन बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक देबब्रत सरकार आदी नामांकित वक्त्यांचा समावेश आहे.
परिषदेबरोबरीनेच या निमित्ताने बँकांमध्ये वापरात येणारे एटीएमचे आधुनिक प्रकार, सुरक्षा उपकरणे, बनावट नोटा ओळखणारी यंत्रे, नोटा मोजणारी यंत्रे, विविध सॉफ्टवेअर प्रणाली, पेमेंट प्रणाली व तत्सम तंत्रज्ञानात्मक नाविन्य व उत्पादनांचे प्रदर्शनही दोन दिवस सुरू राहील. यापूर्वी पहिले आयबेक्स इंडिया परिषद व प्रदर्शन डिसेंबर २०११ मध्ये मुंबईत झाले होते, त्यात जवळपास जगभरातील बँकिंग तंत्रज्ञाननिर्मात्या कंपन्यांचे ५० स्टॉल्स मांडण्यात आले होते. यंदा प्रदर्शनकर्त्यांचा दुपटीने प्रतिसाद मिळून १०० हून अधिक स्टॉल्स मांडले जाणे अपेक्षित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा